राज ठाकरे आल्याने टोल वसुलीला ‘ब्रेक’

मुंबई – टोलविरोधी आंदोलन पुकारणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून पुण्यासाठी निघाल्यानंतर त्यांच्या ताफ्याल द्रुतगती मार्गावर एकही टोलनाक्यावर न अडविता जावू दिले. त्यामुळे राज यांच्या येण्याने काही वाहन चालकांनाही टोल न भरता प्रवास करता आला.

राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले असून, ते आपल्या कारमधून पुण्यात पोचले आहेत. वाशी, खालापूर, तळेगाव या तीन टोलनाक्यांपैकी एकही टोलनाक्यावर त्यांच्या ताफ्याला अडविण्यात आले नाही. त्यावेळी दहा मिनिटे टोल नाका बंद ठेवण्यात आला होता.

टोल नाक्यावर गाड्या अडविण्यासाठी लावण्यात आलेला लोखंडी बार काढून ठेवण्यात आला होते. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी टोल न भरण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिल्यानंतर राज्यभरात टोलनाक्यांची तोडफोड करण्यात आली होती. राज ठाकरे यांच्याविरोधात पुण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण, त्यांच्यावर अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही.