जुन्या नोटा बदलताना लागणार ओळखपत्र

मुंबई –  जुन्या , फाटक्या तसेच मळलेल्या नोटा बँकांतून बदलून घेताना नोटांची संख्या १० पेक्षा अधिक असेल तर संबंधित माणसाला बँकेत आपले ओळखपत्र द्यावे लागणार आहे. ३० जूननंतर नोटा बदलून घेणार्यां साठी हे ओळखपत्र आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

२००५ सालापूर्वी छापलेल्या ५०० व १००० सह सर्व नोटा चलनातून बाद केल्या जाणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने नुकतीच केली आहे. काळा पैसा कमी व्हावा आणि जुन्या फाटक्या, मळलेल्या नोटा कमी पैसे देऊन बदलून देण्याचा जो व्यवसाय सुरू आहे त्याला आळा बसावा तसेच बनावट नोटा चलनातून जाव्यात या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला असल्याचे वरीष्ठ अधिकारी सांगत आहेत.

२००५ सालापूर्वीच्या नोटा १ एप्रिलनंतर चलनात राहणार नाहीत असे सांगताना बँक अधिकारी म्हणाले की यामुळे बँकात नोटा बदलण्यासाठी ग्राहकांना गर्दीला तोंड द्यावे लागेल असे सांगितले जात आहे, त्यात तथ्य नाही. जुन्या फाटक्या व मळलेल्या नोटा नेहमीच नष्ट केल्या जात असतात.२०१२-१३ सालातही १४.१ अब्ज नोटा चलनातून बाहेर काढल्या गेल्या आहेत. २००५ पूर्वी ५०० व १००० च्या नोटा फार कमी प्रमाणात छापल्या गेल्या आहेत. नवीन ५०० व १००० च्या नोटांवर त्या बनावट आहेत वा नाही हे ओळखण्यासाठी अनेक आयडेंटिफिकेशन मार्क आहेत तसे जुन्या नोटांवर नाहीत. त्यामुळे जुन्या चलनातून बनावट नोटा ओळखणे अवघड जाते त्यालाही आळा बसणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे काळा पैसा किती कमी होईल हे सांगणे अवघड आहे मात्र यामुळे नागरिक सोन्यातील गुंतवणुकीकडे पुन्हा वळतील व परिणामी सोन्याची दरवाढ होईल अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत.