कुटुंब परदेशात ? मग प्रमोशन नाही

बिजिंग – भ्रष्टाचार संपविण्यासाठी अनेक कडक कायदे केले जात असलेल्या चीनने आता ज्या महिला वा पूरूष अधिकार्‍यांची कुटुंबे परदेशात आहेत त्यांना प्रमोशन न देण्याचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत भ्रष्टाचाराची जितकी म्हणून प्रकरणे उजेडात आली आहेत त्यात अशा अधिकार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आल्यानंतर हा निर्णय घेतला गेला असल्याचे समजते.

सरकारी समाचार एजन्सी शिन्हुआ नुसार भ्रष्टाचारात अशा अधिकार्‍यांचे प्रमाण सुमारे ८० टक्के आहे. कारण हे अधिकारी देशाची संपत्ती खातात पण कारवाईची वेळ आली की परदेशी जाऊन कायद्यापासून बचाव करून घेऊ शकतात. आर्थिक गैरव्यवहारांचीही आजपर्यंत जेवढी प्रकरणे उजेडात आली त्यातही अशा अधिकार्‍यांचे प्रमाण ४० टक्के असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या महिला अधिकार्‍यांचा पती अथवा मुले परदेशात असतील तसेच ज्या पुरूष अधिकार्‍यांची पत्नी व मुले परदेशात असतील त्यांना यापुढे प्रमोशन मिळणार नाही. यापुढे नोकरीतील बढत्या सेवा ज्येष्ठतेनुसार न देता संबंधित अधिकार्‍यांचे काम पाहूनच दिल्या जाणार आहेत.