नाशिक मनपात भाजपा-मनसे फारकत

नाशिक – राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा बदला घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने नाशिक महानगरपालिकेतला मनसेचा पाठींबा काढून घेण्याची तयारी सुरू केली असून लवकरच या महापालिकेतली ही सत्ताधारी युती संपुष्टात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ही युती संपुष्टात आल्यास नाशिक महापालिकेत विलक्षण गोंधळाचे वातावरण दिसणार आहे.

महानगरपालिकेत मनसे हा सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून निवडून आला, परंतु स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी त्याला भाजपाची मदत घ्यावी लागली. सत्ता मिळवून दोन वर्षे झाली तरी मनसेच्या कार्यकर्त्यांना या महापालिकेत विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे मनसेवर जनता नाराज आहे. त्या व्यतिरिक्त या महापालिकेत मनसेच्याच नगरसेवकांत दोन गट आहेत.

कामगिरी न करता आल्यामुळे होत असलेल्या टीकेतून सुटका करून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी मनपाची सत्ताच सोडण्याची तयारी केली आहे. एकदा भाजपाशी युती मोडली की, राज्यात भाजपाविरोधी भूमिका घेता येईल असा त्यांचा कयास आहे.