दुबईत आलिशान घर खरेदी केल्यास आलिशान कार मोफत

दुबई – सध्या येथे सुरू असलेल्या शॉपिंग फेस्टीव्हलमध्ये दमॅक प्रॉपर्टीज या रियल इस्टेट क्षेत्रातील कंपनीने ग्राहकांना अनोखी ऑफर देऊ केली आहे. या ऑफरनुसार तुम्ही आलिशान अपार्टमेंट खरेदी करणार असाल तर घराचा ताबा मिळतानाच तुम्हाला आलिशान कारही मोफत दिली जाणार आहे. विक्री वाढविण्यासाठी ही ऑफर दिली गेली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

या कंपनीची दुबईतील जागतिक उंचीची इमारत बुर्ज खलिफाजवळच अपार्टमेंटस आहेत. ९३ कोटी रूपयांच्या अपार्टमेंटवर अडीच कोटी रूपये किमतीची लोंबार्गिनी कार मोफत दिली जात आहे. कमी किमतीचे अपार्टमेंट घेतले तर किमतीनुसार त्यावर बीएमडब्ल्यू, मिनी कूपर या गाड्या भेटीदाखल मिळत आहेत.

कंपनीचे उपाध्यक्ष निएल मॅकनोलिन सांगतात आमच्या योजनेला बाजारात अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. विक्रीसाठी असलेल्या अपार्टमेटना स्पा, याट चार्टर्स, प्रायव्हेट जेट चार्टर्स अशाही सुविधा आहेत. २०१३ सालातही कंपनीने अशी योजना राबविली होती त्यावेळी तीन बेडरूमच्या अपार्टमेंटसाठी ऑडी आर ८, दोन बेडरूमसाठी ऑडी ए ८ तर १ बेडरूमसाठी ऑडी ए-४ या गाड्या मोफत दिल्या गेल्या होत्या.