पुणे – आगामी निवडणुकांसाठी पुणे पोलिसांनी इलेक्शन सेलची स्थापना करून त्याचे काम सुरू केले आहे. मात्र गेल्या कांही महिन्यात निवडणुकांअगोदरच व्हीआयपींची येजा वाढल्याने पुणे पोलिसांना त्यांची रोजची आवश्यक कामेही करता येणे अशक्य झाल्याचे सांगितले जात आहे. व्हीआयपींच्या या वाढत्या वर्दळीने पुणे पोलिस त्रस्त झाले आहेत.
पोलिसांतील वरीष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै ऑगस्ट २०१३ या काळात शहरात २०० व्हीआयपी आले होते मात्र नोव्हेंबरपासून ही संख्या लक्षणीय रित्या वाढली आहे. आता दर महिन्याला सुमारे ३०० व्हीआयपी शहरात येत आहेत. त्यांच्या तैनातीसाठी मोठा पोलिस फौजफाटा, पायलट कार द्याव्या लागत आहेतच पण त्याचा ताण मोटर वाहन, कंट्रोल रूम, वायरलेस विंग,स्थानिक पोलिस ठाणी आणि वाहतूक विभागावरही येत आहे.
मुख्यमंत्र्यांनीच येवढ्यात अनेकदा पुण्याला भेट दिली आहे. त्यांच्याबरोबर अनेकदा मंत्री असतात मात्र आम्हाला दिलेल्या माहितीपेक्षा ऐनवेळी १-२ जादा मंत्री येतात. मंत्र्यांचे सचिव पायलट कारची मागणी करतात. मंत्र्याच्या स्वागतासाठी विमानतळावर दोन अधिकारी अडकून पडतात. मंत्री उशीरा आले तरी हे अधिकारी तेथून हलू शकत नाहीत. शिवाय या व्हीआयपींच्या मुक्कामाचा कालावधीही वाढता आहे त्यामुळे पायलट कार अडकून पडतात शिवाय पोलिसांना ड्यूटी लागते ती वेगळीच.
गेले दोन महिने निवडणूका जवळ आल्याने बहुतेक मंत्र्यांच्या बैठका होत आहेत.त्यामुळे तेथेही सुरक्षेसाठी पोलिस लागतात. शहराची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे पण पोलिसांचे बळ मात्र तेवढेच राहिल्याने व त्यातच व्हीआयपींच्या वर्दळीमुळे तपासाची महत्वाची कामे मागे राहात आहेत असे या अधिकार्यययांचे म्हणणे आहे.