वॉशिंग्टन – पाकिस्तानला समर्थन देण्याच्या भूमिकेबद्दल सर्वपरिचित असणारे अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स यांनी आज (गुरुवार) पाकिस्तान हे अमेरिकेचे मित्रराष्ट्र नसल्याचे वक्तव्य केले. त्याचबरोबर, पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणाचा कधीही त्याग करणार नाही आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेचा कुख्यात नेता ओसामा बिन लादेन याला पाक सैन्यास अपमानित करण्यासाठीच अशा प्रकारे छापा घालून ठार करण्यात आले, असे मत गेट्स यांनी व्यक्त केले आहे.
लादेन याच्या पाकमधील अबोटाबाद येथील घरावर छापा मारण्याआधी पाक सैन्याची मदत घेण्याचा विचारही ओबामा प्रशासनामधील कोणाच्या मनी आला नाही, असे गेट्स यांनी सांगितले. “”पाकिस्तानमध्ये या हल्ल्यासाठी कोणाची मदत वा परवानगी घ्यावी, असा विचारही कोणाच्या मनी आला नाही. पाक सैन्याचा पाणउतारा करण्याठीच लादेन याला अशा प्रकारे छापा घालून ठार करण्यात आले,” असे गेट्स यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटले आहे. “”पाकिस्तान व अमेरिकेचे संबंध पुरते बिघडून कराची येथून अमेरिकेच्या सैन्यास होणाऱ्या रसदपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहासमोर मी पाकिस्तानला पाठिंबा दिला.
मात्र असे असले तरी; पाकिस्तान हा अमेरिकेचा सहकारी देश नसल्याचे मला माहित होते,” असे गेट्स यांनी त्यांच्या “ड्युटी: मेमॉईर्स ऑफ अ सेक्रेटरी ऍट वॉर’ या आगामी पुस्तकामध्ये म्हटले आहे. गेट्स यांनी 2010 मध्ये पाकिस्तानला दुसरी व अखेरची भेट दिली होती. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी, पंतप्रधान युसुफ रझा गिलानी व सैन्यप्रमुख अश्फाक परवेझ कयानी यांची भेट घेतली होती. “या भेटीवरून परतताना पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे धोरण कधीही सोडणार नाही, अशी माझी खात्री झाली,’ असे गेट्स यांनी या पुस्तकामध्ये स्पष्ट केले आहे. गेट्स हे डिसेंबर 2006 ते जुलै 2011 पर्यंत अमेरिकेचे संरक्षण मंत्री होते.