
कॉंग्रेसचे नेते सध्या आत्मघाताच्या मार्गावर आहेत. कारण महागाई वाढल्यामुळे लोक आपल्या विरोधात गेले आहेत हे कळूनसुध्दा अजूनही या पक्षाचे नेते आणि पंतप्रधान मनमोहनसिंग हे महागाईला आटोक्यात ठेवण्यासाठी कसलीही पावले टाकत नाहीत उलट महागाई अधिक वाढेल अशी पावले मात्र जाणीवपूर्वक टाकत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा पराभव होणार हे उघड आहे. परंतु त्यामुळे लोकांना किती त्रास होणार आहे याचा अंदाज या लोकांना का येत नाही हे कळत नाही. महागाई कितीही वाढली तरी त्यांच्या संवेदनाहीन हृदयाला कसलीच जाणीव होत नाही. किंबहुना महागाई हे फार मोठे संकट आहे असे त्यांना वाटतच नाही. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या आपल्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेत महागाई रोखता आली नाही अशी स्पष्ट कबुली दिली. किंबहुना चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकात कॉंग्रेसला सर्वाधिक फटका बसवणारा कोणता घटक असेल तर तो महागाई हाच आहे. चार राज्यातल्या निकालांवरून पूर्ण देशातल्या राजकीय वातावरणाचा अंदाज येत नसतो; प्रत्येक राज्याचे राजकारण वेगळे असते; प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे असतात असे म्हणून कॉंग्रेसचे नेते आपल्याच मनाचे समाधान करून घेत आहेत. परंतु हे समाधान फसवे आहे असे काही मतदारांच्या चाचण्यांवरून दिसून येत आहे.
एका हिंदी दैनिकाने मतदारांचा कानोसा घेतला. त्यावरून आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या जागा १०० पेक्षाही कमी होतील असे दिसून आले आहे. या मागचे कारण काय असावे? महागाई या एका प्रश्नावर कॉंग्रेसला मोठा फटका बसणार आहे हेच यातून दिसून येते. महागाई हा पूर्ण देशातल्या जनतेला जाणवणारा विषय असतो. परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी राहुल गांधींची प्रतिमा या एकाच गोष्टीवर भर द्यायचे ठरवले आहे. नेत्याची प्रतिमा हा विषय लोकांचे मानसिक समाधान करणारा असतो. परंतु महागाई हा विषय दैनंदिन जीवनात पावला पावलाला माणसाला अस्वस्थ करणारा असतो. जीवन नकोसे करणारा असतो. मात्र त्याची जाणीव मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांना नाही त्यामुळे त्यांनी कधीच महागाई रोखण्यासाठी कठोर पावले उचलली नाहीत. आता लोकांना लागणार्या स्वयंपाकाच्या टाकीची किंमत हे सरकार वाढवत चालले आहे. गेल्या दोन वर्षामध्ये अनुदानित गॅसच्या टाकीची किंमतसुध्दा जवळपास ७० ते ८० रुपयांनी वाढली आहे. ही वाढती किंमत लोकांना असह्य होत असतानाच, जनतेची सबसिडी जनतेच्या खात्यात नावाची नवी चेष्टा सुरू केली आहे आणि वाढलेल्या किंमतीमुळे झालेल्या जखमेवर या सबसिडीचे मीठ चोळण्यास सुरूवात केली आहे.
जनतेची सबसिडी जनतेच्या खात्यात जमा केल्याने लोकांना खूप आनंद होईल असे जनतेपासून दूर गेलेल्या या नेत्यांन वाटत आहे. आता ही योजना काही जिल्ह्यांना लागू झाली आहे आणि तिचे स्वरूप पाहिल्यानंतर लोक भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणायला लागले आहेत. या योजनेत ग्राहकांना आपल्या घरी गॅस आल्याबरोबर त्याची विनाअनुदानित टाकीएवढी किंमत चुकवावी लागणार आहे. हा विनाअनुदानित गॅस सरकारने महागही केला आहे आणि त्याची किंमत १३०० रुपये झाली आहे आणि अनुदानित गॅसची किंमत ४५० रुपये आहे. आधी लोकांना गॅसचे ४५० रुपये द्यावे लागत होते आणि त्यावरची सबसिडी सरकार परस्पर गॅस कंपनीला देत होते. आता मात्र लोकांना आता पूर्ण म्हणजे १३०० रुपये द्यावे लागणार आहेत आणि १३०० व ४५० यातला फरक म्हणजे सबसिडी नंतर लोकांच्या खात्यात जमा होणार आहे. या पध्दतीमध्ये भ्रष्टाचार कमी होईल असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु ही योजना लोकांसाठी संकट ठरली आहे. आता गॅस आल्यानंतर त्याचे १३०० रुपये द्यायचे आणि नंतर सबसिडीची वाट बघायची अशी लोकांवर आली आहे.
सरकारचा कारभार भ्रष्टाचाराचा आणि दिरंगाईचा आहे. हे सरकारच मान्य करते. तो भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारने आपल्या यंत्रणांचा वापर करण्याऐवजी जनतेला वेठीस धरले आहे आणि सबसिडीतला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लोकांना गॅसची पूर्ण किंमत द्यायला भाग पाडले आहे. एकदा ही पूर्ण रक्कम भरली की लोकांना सबसिडीची वाट बघावी लागणार आहे आणि तिथे दिरंगाईचा फटका लोकांना बसणार आहे. या सगळ्या योजनेमध्ये जनतेचा फायदा काय याचा काहीच बोध कोणालाच होईनासा झाला आहे. गॅस पूर्वी प्रमाणे ४५० रुपयांनाच मिळणार आहे. मात्र आधी १३०० रुपये भरण्याचा त्रास लोकांना होणार आहे. पण या योजनेमुळे लोक खूष होतील असे सरकारला का वाटले आणि लोक खूष होतील असा सरकारला सल्ला देणारे शहाणे लोक कोण आहेत याचा शोध घ्यावा लागणार आहे. सध्या कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला देणार्यांनी त्यांची हेतूतः दिशाभूल करण्याचेच ठरवले आहे की काय अशी शंका काही वेळेला येते. कारण तसे असल्याशिवाय सरकारने मोठ्या उत्साहाने लोकांच्या डोक्यावर महागाईचा वरवंटा असा फिरवला नसता. पेट्रोल आणि डिझेलवरच्या किंमतीवरचे सरकारचे नियंत्रण संपल्यामुळे त्याही इंधनाच्या किंमती वाढत चालल्या आहेत. आपल्याला जनमताचा फटका महागाईनेच बसला हे कबूल करणारे पंतप्रधान महागाई कमी करण्याऐवजी निवडणुका जवळ येत असतानाच ती वाढवत चालले आहेत. एखादा माणूस जाणीवपूर्वक अधःपतनाकडे कशी वाटचाल करत असतो याचे हे ज्वलंत उदाहरण होय.