वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक बराक ओबामा यांनी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांना वॉशिग्टन भेटीचे आमंत्रण दिले आहे. मर्केल स्किईंन करताना पडल्याने जखमी आहेत.त्यांच्या प्रकृतीची फोनवरून विचारपूस करताना ओबामा यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना दोघांच्याही सोयीने वेळ ठरवून अमेरिका भेटीवर येण्यासाठीचे आमंत्रण दिले असे व्हाईट हाऊस तर्फे सांगण्यात आले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थतर्फे जगभरातील महत्त्वाच्या नेत्यांच्या फोन आणि ईमेलवर ठेवल्या जात असलेल्या पाळतीसंबंधी या संस्थेतील कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने वाच्यता केली होती आणि त्यात मर्केल यांच्या फोन व ईमेलवरही या संस्थेची नजर असल्याचे उघड केले होते. त्यानंतर मर्केल अतिशय संतापल्या होत्या आणि त्यांनी त्यांची नियोजित अमेरिका भेट रद्द केली होती. इतकेच नव्हे तर मित्रराष्ट्रांवर अशी नजर ठेवणे हा विश्वासघात असल्याचे परखड मतही व्यक्त केले होते. त्यावर व्हाईट हाऊसतर्फे मर्केल यांची माफी मागण्यात आली होती आणि अमेरिकन हेर भविष्यातही कधी मर्केल यांच्या फोनवर हेरगिरी करणार नाहीत असे सांगण्यात आले होते.
ओबामा अमेरिकन नागरिकांशी या महिन्यात राष्ट्रीय संरक्षण संस्थेकडून केले जात असलेले फोन टॅपिंग आणि डेटा कलेक्शन अॅक्टिव्हिटीज सबंधी संवाद साधणार आहेत त्यात स्नोडेनसंदर्भातही ते बोलणार आहेत. त्यापूर्वीच मर्केल यांना अमेरिका भेटीचे आमंत्रण दिले गेले आहे. ओबामा आणि मर्केल हे जुने दोस्त आहेत असे सांगतानाच ओबामा यांनी मर्केल यांना नवीन कॅबिनेटबद्दल शुभेच्छाही दिल्या असल्याचे समजते.