फ्रान्सचे राष्ट्रपती होलंड यांची हुकलेली हस्तांदोलने

कोणत्याही दोन देशांचे प्रमुख नेते समक्ष भेटले की प्रथम हस्तांदोलन केले जाते. मात्र गेल्या वर्षात फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रास्वा होलंड यांनी ज्याज्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी घेतल्या त्यात बहुतेक वेळा त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा होलंड यांचा मानस पूर्ण झालाच नाही असे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या -फेल्ड हँडशेकस – फोटो मालिकेतून दिसून आले आहे. डच वर्तमानपत्र वोल्सक्रांतने ही बातमी दिली आहे.

यात म्हटले गेले आहे की इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी होलंड यांनी हात पुढे केला मात्र हसन यांनी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढेच न केल्याने होलंड यांना प्रतिक्षा करावी लागली. दक्षिण कोरियाचे पार्क गेनहाई यांनीही हस्तांदोलनासाठी होलंड यांना प्रतीक्षा करायला लावली तर स्लोवानियाच्या प्रधानमंत्री एलंका ब्रतुरेक याना होलंड यांनी हात पुढे केल्यानंतर तो हस्तांदोलनासाठी केला आहे हे लक्षातच आले नाही. परिणामी हे हस्तांदोलन झालेच नाही.

रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव हे होलंड यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला तेव्हा दुसरीकडेच पाहात होते तर कोस्टारिकाच्या राष्ट्रपती लॉरा चिचिला यांचेही होलंड यांच्या पुढे केलेल्या हाताकडे लक्षच नव्हते. क्रोएशियाच्या प्रधानमंत्री जोरान मिलानोविक यांनी होलंड यांनी खूप येळ प्रतिक्षा केल्यानंतर हस्तांदोलन केले तर फिनलंडच्या वित्तमंत्री जुटा उरापिलेनियमन यांनी हस्तांदोलन केलेच नाही.

या अनुभवावरून शहाणे होत होलंड यांनी नंतर आपणहून हस्तांदोलनासाठी हात पुढे करणे कमी केले असेही सांगितले जात आहे.