बर्लिन – जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल स्वित्झरर्लंडमध्ये हिवाळी सुटीवर गेल्या असताना क्रॉस कंट्री स्कीईंग करताना जखमी झाल्या असून त्यांच्या खुब्याचे हाड मोडले असल्याचे समजते. परिणामी त्यांच्या महत्त्वाच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. मर्केल यांची नियोजित वार्सा ट्रिपही रद्द करण्यात आली आहे.मात्र पोलंडच्या पंतप्रधानांशी त्या फोनवरून बोलणार आहेत असे प्रवकते स्टीफन सिबर्ग यांनी सांगितले आहे.
सिबर्ग म्हणाले की दरवर्षी चान्सेलर मर्केल हिवाळी सुटीसाठी क्रॉस कंट्री स्कीईंग ला जातात तशाच त्या यावर्षीही गेल्या होत्या. ३० डिसेंबरला स्कीईंग करताना त्या पडल्या. मात्र त्यावेळी जखमेचे गांभीर्य लक्षात आले नव्हते. बर्लिनला परतल्यावर पूर्ण तपासणी केली असता त्यांच्या खुब्याचे हाड मोडले असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी त्यांना तीन आठवडे पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्या घरूनच काम पाहणार आहेत.
५९ वर्षीय मर्केल तिसर्यांदा जर्मनीच्या चॅन्सलर बनल्या आहेत मात्र प्रथमच त्यांना को अॅलिशन सरकार बनवावे लागले आहे. या नव्या सरकारची बैठक होणार होती तीही मर्केल यांच्या अपघातामुळे पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.