मुंबई -प्रथम प्रयत्नातच दिल्लीत सरकार स्थापन करण्यात यश मिळविलेल्या आम आदमी पक्षाचा आत्मविश्वास अधिकच वाढला असून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ज्या जागा लढविणार आहे त्या सर्व जागी आम आदमी उमेदवार उभे करणार असल्याचे पक्षाचे नेते मयंक गांधी यांनी जाहीर केले आहे. ते म्हणाले दिल्लीत आम्ही शीला दीक्षितांचा जसा पराभव केला तसाच पराभव राष्ट्रवादीचे शरद पवार यांचाही करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत मात्र आम्हाला घाबरून शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात नक्की किती जागा लढवायच्या याचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल असे सांगून गांधी म्हणाले की महाराष्ट्रात पक्षाचे १० लाख सदस्य २६ जानेवारीपर्यंत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आत्तापर्यंत २ लाख जणांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे. २० जानेवारीला उमेदवारांचा नावाची घोषणा केली जाणार आहे. मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणावर आमच्या कडे येत आहे कारण मोदींना पंतप्रधान बनण्यापासून आम्हीच रोखू शकतो असा त्यांना विश्वास वाटतो आहे असेही गांधी यांनी सांगितले.
मुस्लीम समाजाच्या कांही नेत्यांनी जेथे भाजपचा पराभव आम आदमी पक्ष करू शकेल अशी खात्री वाटेल त्या त्या ठिकाणी पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.