एटीएमच्या दरात तूर्तास वाढ नाही- होटा

मुंबई – एटीएम सेंटरवरील सुरक्षिततेच्या मुद्यावरून दरवाढ करण्याचा तूर्तास कोणताही विचार नाही, असे राष्ट्रीय वित्तीय महामंडळाचे (एनपीसीआय) व्यवस्थापकीय संचालक ए. पी. होटा यांनी सांगितले आहे.

बंगळूरमध्ये एका एटीएममध्ये महिलेवर झालेल्या जीवघेणा हल्ल्यानंतर एटीएमच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला होता. एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून दरामध्ये वाढ करण्याची मागणी बँकांनी केली होती. मात्र, एटीएमएमच्या दरामध्ये नवीन कोणतीही वाढ करण्याचा विचार नसल्याचे होटा यांनी सांगितले आहे. एटीएमच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, तीन पाळ्यांमध्ये सुरक्षारक्षक ठेवावे लागत आहे. यामुळे सुरक्षारक्षकांनाच महिन्याला किमान तीस हजार रुपये वेतन द्यावे लागत आहे.

एका एटीएम सेंटरमधून दिवसाला 150 ट्रान्झॅक्‍शन झाले तरी महिन्याला साडेचार हजार ट्रान्झॅक्‍शन होतात. या ट्रान्झॅक्‍शनवर सरासरी 6.6 रुपये एवढा खर्च येत असल्याचे बँकांनी सांगितले होते. दरम्यान, खातेधारकांना इतर बँकेच्या एटीएममधून महिनाभरात पाच वेळा पैसे काढण्याची मुभा आहे. मात्र, त्यापुढे दर आकारले जातात.