राजीनाम्याची चर्चा का होते?

पंतप्रधान मनमोहन सिंग हे यूपीए सरकारला तिसर्‍यांदा संधी मिळवून देऊ शकणार नाहीत. कारण ते प्रभावी पंतप्रधान नाहीत. त्यांनी स्वतःच ते मान्यही केले आहे आणि आपण तिसर्‍या टर्मसाठी उत्सुक नसल्याचे जाहीरही केले आहे. त्यामुळे अधूनमधून त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या उठत असतात. मनमोहन सिंग कसलेही असले तरी त्यांनी गेल्या दहा वर्षात स्वतःहून पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची चर्चा कधीच केली नाही. असे असले तरी कॉंग्रेस मधल्याच राहुल गांधींच्या समर्थकांच्या गटाने गेल्या दोन-तीन वर्षांपासून मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुढे रेटायला सुरूवात केली आहे. मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यावा आणि राहुल गांधींनी हातात सूत्रे घेऊन कारभार चालवावा असा या गटाचा कावा आहे. त्यांच्या या संबंधातल्या सातत्याच्या चर्चांमधूनच दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची बातमी पसरली. कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने एका वर्तमानपत्रातल्या या बातमीचा ताबडतोब खुलासा केला आणि मनमोहनसिंग आपली मुदत पूर्ण करतील अशी ग्वाही दिली. हा खुलासा करण्यात आला असला तरी अशा प्रकारची बातमी का पसरते याचा विचार करावा लागणार आहे.

कदाचित मनमोहन सिंग उद्या राजीनामा देणारही नसतील परंतु अशा चर्चा अगदी निराधार नसतात हे लक्षात ठेवले पाहिजे. आता या बातमीच्या बाबतीतसुध्दा असेच घडलेले आहे. अशा प्रकारची बातमी निर्माण व्हावी आणि एका गटाने का होईना पण मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करावी अशी स्थिती कॉंग्रेसमध्ये आहे. पंतप्रधान राजीनामा देणार या बातमीचा इन्कार करणार्‍या प्रवक्त्याने अशी चर्चा सुरू असल्याच्या शक्यतेचा इन्कार मात्र केलेला नाही. राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारून त्यांना मोदींच्या समोर कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उभे करण्याचा खटाटोप कॉंग्रेसमध्ये सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हे राजीनामा प्रकरण सुरू झालेले आहे. मुळात पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करायचाच नाही असे ठरवले होते. तशी पध्दत कॉंग्रेसमध्ये नाही. असे पक्षाचे म्हणणे आहे. पण याही म्हणण्यात काही तथ्य नाही. कारण कॉंग्रेसचे याबाबतचे धोरण त्यांच्या सोयीवर अवलंबून असते. जनतेची मते खेचून घेईल असा नेता समोर असतो तेव्हा तो आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार आहे असे कॉंग्रेसचे नेते सांगतच असतात.

इंदिरा गांधी यांच्या काळात निवडणुका होत असताना इंदिरा गांधी या आपल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार नाहीत असे कॉंगे्रसने कधी म्हटले नव्हते. त्या मते खेचू शकत होत्या. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांना तसे म्हणावे हे सोयीचे होते. आता राहुल गांधी मते खेचू शकत नाहीत. मोदींच्या पुढे ङ्गिके पडतात. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणणे सोयीचे नाही. म्हणून कॉंग्रेस पक्षाने आमच्याकडे तशी पध्दत नाही असे सांगायला सुरूवात केली आहे. कॉंग्रेसचे धोरण काहीही असले तरी जनतेचे धोरण तसे नाही. जनतेला तुमचा नेता कोण हे माहीत असण्याची गरज वाटते. अर्थमंत्री पी. चिदंबरम अशा राजकीय विषयावर कधी ङ्गार बोलत नाहीत. पण त्यांनीसुध्दा कॉंग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे असे आग्रहाने म्हटले आहे. परिस्थितीचा रेटाच असा आहे की कॉंग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न केल्यास कॉंग्रेस पक्षाचा पराभव होण्यास ते एक कारण ठरू शकेल. त्यामुळे कॉंग्रेसच्या एका गटाला राहुल गांधींची उमेदवारी जाहीर करावी असे वाटू शकते. परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांनी कितीही नाही म्हटले तरी दिल्लीतला पराभव आणि अरविंद केजरीवाल यांचा उदय यापासून कॉंग्रेसचे नेते काही धडे घ्यायला लागले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मोङ्गत पाणी आणि निम्म्या दरात वीज या दोन घोषणा केल्या. या घोषणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढविण्याची क्षमता आहे. केवळ दिल्लीतच नव्हे तर पूर्ण देशामध्ये केजरीवाल हे आकर्षणाचा विषय ठरले आहेत.

आजवर विविध राज्यात सरकारे स्थापन करणार्‍या आणि अनेक वर्षांची परंपरा असलेल्या राजकीय पक्षांना अनेक वर्षात जे जमले नाही ते केजरीवाल यांनी ४८ तासात करून दाखवले. हे जनतेला दिसतच आहे. अशाच प्रकारे राहुल गांधींनी काही केले तर ते सुध्दा मोदींवर मात करून देशभर लोकप्रिय होऊ शकतील असे कॉंग्रेसमधल्या काही लोकांना वाटत असल्यास नवल नाही. कारण गोष्ट साधी आहे. राहुल गांधी सहज पंतप्रधान होऊ शकतात आणि हा नेतृत्वातला बदल एक दोन महिन्यात करून अरविंद केजरीवाल यांच्या स्टाईलने दोन-चार मोठे निर्णय जाहीर करून टाकले की राहुल गांधीसुध्दा हिरो होऊ शकतात. असे या गटाला वाटत असणार. राहुल गांधींची प्रतिमा तयार करण्यासाठी कॉंग्रेसमधला एक गट एवढा आतूर झाला आहे की त्यासाठी तो अशा काही युक्त्या शोधायला लागला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी नाही तरी तिसर्‍या टर्मसाठी उत्सुक नसल्याचे म्हटलेच आहे. तेव्हा राहुल गांधींना संधी देऊन त्यांच्या प्रतिमेचा विकास केला तर येती निवडणूक आपल्याला सहज जिंकता येईल असे या गटाला वाटत असावे. नाही तरी राहुल गांधींच्या प्रतिमेसाठी अन्य कोणताच मार्ग उपलब्ध राहिलेला नाही. तात्पुरता पंतप्रधान होण्याचा मार्ग मात्र सहज उपलब्ध आहे. म्हणून राजीनाम्याच्या बातम्या निर्माण झाल्या आहेत. त्या अगदीच निराधार नाहीत.