जळगाव – घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना आज (मंगळवार) जळगाव सत्र न्यायालयाने 3 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुलाबराव देवकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना 31 डिसेंबरपर्यंत पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
आज सकाळी आकरा वाजता देवकर जळगाव पोलिस ठाण्यात हजर झाले. तेथून दुपारी त्यांना न्यायाधीश एन. के. क्षीरसागर यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यांनी देवकर यांना 3 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाविली. न्यायालयीन कामकाजानंतर त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले. पुढील कामकाज हे धुळे न्यायालयात न्यायाधीश कदम यांच्यासमोर चालणार आहे.