न्यूझीलंड दौ-यासाठी संघ जाहीर, युवराजला डच्चू

मुंबई- मध्य प्रदेशचा मध्यमगती गोलंदाज ईश्वर पांडेला न्यूझीलंड दौ-यासाठी प्रथमच भारताच्या कसोटी आणि वनडे संघात स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी खेळण्याची संधी न मिळालेला डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाची जागा पांडेने घेतली आहे. द.आफ्रिकेत कसोटी खेळलेल्या संघातील हा एकमेव बदल न्यूझीलंड दौ-यासाठी करण्यात आला आहे. मात्र न्यूझीलंड दौ-यातील वनडे मालिकेतून अनुभवी अष्टपैलू युवराज सिंगला वगळण्यात आले आहे.

मध्यमगती गोलंदाज वरूण आरोनचेही वनडे संघात पुनरागमन झाले. न्यूझीलंड दौऱ्यात भारत १९ जानेवारीपासून पाच वनडे खेळणार आहे. सहा फेब्रुवारीपासून दोन कसोटींच्या मालिकेला न्यूझीलंडमध्ये प्रारंभ होईल. न्यूझीलंडमधील वेगवान गोलंदाजीला साथ देणा-या खेळपट्या पाहून संघ निवडीला प्राधान्य देण्यात आले आहे. १९८३च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे क्रिकेटपटू आणि सध्या निवड समितीचे सिलेक्टर रॉजर बिन्नी यांचा मुलगा अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीचा प्रथमच भारताच्या वनडे संघात समावेश झाला आहे. मध्यमगती गोलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून तो उपयुक्त आहे.

कर्नाटककडून रणजी सामन्यांमध्ये त्याने अष्टपैलू योगदान दिले आहे. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्येही त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे त्याने काही महिन्यांपूर्वी भारत ह्यअह्ण संघाकडून दक्षिण आफ्रिका दौराही त्याने केला होता. त्याचे अष्टपैलूत्व न्यूझीलंडमधील वातावरणाला उपयुक्त ठरू शकते, असा निवड समितीचा अंदाज आहे. द.आफ्रिकेतील वनडे आणि कसोटी मालिकेत अपयशी ठरलेला सलामीवीर शिखर धवनने दोन्ही संघांमध्ये त्याचे स्थान राखले. ते पाहता पुन्हा एकदा गौतम गंभीरचा विचार झालेला नाही. वास्तविक गेल्या न्यूझीलंड दौ-यात गंभीर हा भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. त्यातच यंदा रणजी करंडकातही त्याची कामगिरी ब-यापैकी होती.

द.आफ्रिकेत कसोटी मालिकेत सपशेल अपयशी ठरलेला रोहित शर्मा त्याचे कसोटी संघात स्थान टिकवण्यात यशस्वी ठरला आहे. रोहितला द.आफ्रिकेत वनडेतही चमक दाखवता आली नव्हती. मात्र तेथेदेखील त्याचे स्थान पक्के राहिले. युवराजला द.आफ्रिकेतील वनडे मालिकेत प्रभाव पाडता आला नव्हता. त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशातील वनडे मालिकांतही त्याचे अपयश सुरू होते. यंदाच्या रणजी हंगामातही त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. द.आफ्रिकेतील वनडे मालिकेत महागडा ठरलेला मध्यमगती गोलंदाज मोहित शर्माचाही विचार झाला नाही. याउलट वनडे संघातून वगळण्यात आलेला मध्यमगती उमेश यादवला कसोटी संघात स्थान टिकवता आले. द.आफ्रिकेत मात्र त्याला एकही कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. भारताचा वनडे संघ न्यूझीलंड दौ-यावर १२ जानेवारीला रवाना होणार आहे. झहीर खान, चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय हे कसोटीपटूदेखील न्यूझीलंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लवकर रवाना होणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.

Leave a Comment