केजरीवाल सरकारची हालहवाल

नवी दिल्ली – नव्याने सत्तेवर आलेल्या आप पक्षाकडून दिल्लीतील नागरिकांना घरटी ७०० लिटर पाणी मोफत देण्यासंबंधीच्या आश्वासनासंदर्भात आज महत्वाची घोषणा केली केली जाणार असल्याची चर्चा होत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तापाने फणफणले असून त्यांना डायरियाही झाला असल्याचे समजते. यामुळे आज ते सचिवालयात जाणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. पाणी बोर्ड अधिकार्‍यांबरोबर केजरीवाल आज बैठक घेणार होते. त्यांचे अन्य मंत्री सचिवालयात जाऊन काम करणार आहेत. केजरीवाल यांच्या तब्येतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत असेही समजते.

शिक्षण आणि शहरी विकास मंत्री आणि आपचे प्रवक्ते मनीष सिसोदिया यांना मयूरविहार फेज २ येथील घर आणि कार्यालय दिले गेले असून त्याची दुरूस्ती सुरू आहे. ही दुरूस्ती कमीतकमी खर्चात केली जावी अशी सूचना सिसोदिया यांनी केली आहे. ही दुरूस्ती ४ ते ५ लाख रूपये खर्चून केली जाणार आहे.

परिवहन मंत्री सौरभ भारद्वाज हे सध्या विदाऊट मोबाईल आहेत. त्यांचा मोबाईल फोन रामलिला मैदानावर झालेल्या शपथविधीच्या वेळी हरविला आहे आणि त्यांच्याकडे दुसरा मोबाईल नाही. मात्र हरविलेल्या फोनसंदर्भात त्यानी पोलिसांत तक्रार दिलेली नाही.