आत्महत्येला कारणीभूत रेल्वे अधिका-यावर गुन्हा दाखल

डोंबिवली : रेल्वे अधिकाºयांच्या छळवणुकीमुळे मला जीवन संपवावे लागत आहे, अशा नैराश्याच्या भावनेतून लिहिलेल्या पत्रातून सीएसटी रेल्वे स्थानकावर आत्महत्या करणा-या अनिता पटेलने तिची रेल्वे अधिकाºयांनी केलेली ससेहोलपट उघड केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेले पत्र गुरुवारी तिच्या पालकांच्या हाती लागले. या पत्राच्या आधारे कमर्शियल इन्स्पेक्टर विल्यम केरी या अधिका-यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून अन्य तिघांची चौकशी करण्यात आली.

डायरीच्या एका पानावर तिने हे पत्र (सुसाइड नोट) लिहिले असून, दुस-या पानावर अनिताने डोळ?ांतून अश्रू ओघळत असलेल्या मुलीचे म्हणजे स्वत:चे चित्र काढले होते. मध्य रेल्वेच्या डीआरएम इमारतीत गुरुवारी अनिताने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले होते. अनिताने आत्महत्या केल्याने तिच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. गुरुवारी डोंबिवलीतील शिवमंदिर मोक्षधाम स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिताच्या कपाटातील एका खणात असलेल्या डायरीत तिने लिहिलेली सुसाइड नोट तिच्या कुटुंबीयांना मिळाल्याची माहिती अनिताचे वडील कमलाप्रसाद यांनी मुंबई पोलिसांना दिली.

या पत्रामध्ये तिच्या मृत्यूला रेल्वे अधिकारी दोषी असल्याचे अनिताने म्हटले असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. रेल्वे अधिका-यांच्या त्रासाला कंटाळून ती आत्मदहन करेल असे कधीच वाटले नव्हते, असे तिचे वडील कमलाप्रसाद यांनी सांगितले. त्यामुळे रेल्वे अधिकारी असा काय त्रास देत होते की ज्यामुळे अनिताला आत्मदहन करण्यास प्रवृत्त व्हावे लागले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.