आपचे कुमार विश्वास अमेठीत दाखल

अमेठी – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघाला भेट देण्यासाठी आणि झाडू संदेश यात्रेत सहभागी होण्यासाठी आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास आज तेथे दाखल झाले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकांत यश मिळविल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या आम आदमी पक्षाने आता लोकसभा निवडणुकांतही महत्त्वाच्या जागा लढविण्याची तयारी सुरू केली असून कुमार विश्वास यांची अमेठी भेट त्याच कारणासाठी असल्याचे समजते.

अमेठीतून कुमार विश्वास राहुल गांधी यांच्याविरोधात लोकसभा रिंगणात उतरणार असल्याचे संकेत आम आदमी पक्षाने यापूर्वीच दिले आहेत. विश्वास तेथे झाडू संदेश यात्रेत सहभागी होतानाच अमेठी मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचाही अंदाज घेणार आहेत. या भेटीतच ते मतदारसंघातील मतदारांत आम आदमी पक्षाबाबत जागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू करणार असल्याचे पक्षातील वरीष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. अमेठीतील पक्ष कार्यालयात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारांना मोबिलाईज कसे करायचे याचे मार्गदर्शनही करणार आहेत.

आम आदमी पक्षाने गुजराथेतील सर्व २६ लोकसभा जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना त्यांच्या होम पीचवरच आव्हान दिले जाणार आहे. मध्यप्रदेशातही पक्ष लोकसभा रिंगणात उतरणार आहे मात्र तेथे किती जागा लढवायच्या याचा निर्णय अद्यापी झालेला नाही असेही सांगण्यात येत आहे.