पणजी – दररोज सरासरी किमान सहा नागरिक ’गोव्याचे रहिवासी’ ही ओळख सोडून पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारत असल्याची माहिती पणजीतील निवडणूक आयोगाकडील नोंदींवरून समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत एकूण ११,५०० गोव्याच्या नागरिकांनी भारतीय पारपत्र रद्द करून पोर्तुगालचे पारपत्र मिळविले आहे, असे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
३१ जानेवारी, २००८ ते ३१ जानेवारी, २०१३ या कालावधीतील ही आकडेवारी आहे. नागरिकत्व बदललेल्यांपैकी आतापर्यंत २,७०० नागरिकांचे मतदानाचे अधिकार रद्द झाले असून मतदारांच्या यादीतूनही त्यांचे नाव वगळले आहे. अद्याप ८,८०० नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पोर्तुगिजांच्या ताब्यातून गोवा १९६१ मध्ये स्वतंत्र झाले. मात्र, गोव्याच्या नागरिकांसाठी पोर्तुगीज नागरिकत्व मिळण्याच्या नियम अत्यंत सोपे ठेवण्यात आले आहेत.
परदेशी पारपत्र असलेल्या सर्व नागरिकांचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी गोव्यातील मतदारांच्या सुधारित याद्या बनविण्याचे काम सुरू आहे. अंतिम सुधारित मतदार यादी जानेवारी २०१४ अखेरीस जाहीर केली जाईल.