अहमदाबाद – गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगल प्रकरणात मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह ५९ जणांना क्लीन चीट दिल्याच्या निर्णयाविरुद्धची याचिका अहमदाबादच्या न्यायालयाने फेटाळून लावल्याने मोदी यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर मोदी समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. मोदी यांच्यासह ५८ जणांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) क्लीन चीट देण्याविरुद्ध काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार अहसान जाफरी यांच्या पत्नी झाकीया जाफरी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
एसआयटीकडून दिलेली क्लिन चीट योग्य असल्याचे सागून एसआयटीचा क्लोजर रिपोर्ट न्यायदंडाधिकारी गनत्रा यांनी स्वीकारला आहे. मात्र, या निर्णयाविरुद्ध जाफरी उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतात, असेही न्यायदंडाधिकाºयांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह ५९ जणांना २००२ च्या जातीय दंगलीत जीव गमवावा लागला. झाकिया जाफरी यांनी २००८ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगलीच्या तपासासाठी एसआयटीची स्थापन केली होती.
नरेंद्र मोदी आणि अन्य काहीजणांनी मिळून गुजरात दंगलीचे कारस्थान रचल्याचा आरोप जाफरी यांनी केला होता. या गुलमर्ग सोसायटी हत्याकांडाला नरेंद्र मोदी जबाबदार असून राज्यभर पसरलेल्या दंगलीमधील वादग्रस्त भूमिकेमुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी झाकीया जाफरी यांनी केली होती. दंगल प्रकरणाचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एसआयटीने आठ फेब्रुवारी, २०१२ रोजी त्यांचा अंतिम अहवाल न्यायालयासमोर सादर केला.
मोदी यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असे त्यात नमूद करण्यात आले होते. मात्र एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टला झाकीया जाफरी यांनी आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची याचिका रद्दबातल ठरविली आहे. मोदींना न्यायालयाने क्लिन चीट दिल्यानंतर झाकीया जाफरी यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.