रांची – झारखंडमधील लोह खाण घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अपक्ष खासदार मधू कोडा यांनी आता कॉंग्रेसमध्ये प्रवेश करायचे ठरवले असून येत्या ३० तारखेला मधू कोडा आणि त्यांच्या पत्नी आमदार गीता कोडा हे दोघे आपल्या काही सहकार्यांसह कॉंग्रेसमध्ये रीतसर दाखल होणार आहेत. गीता कोडा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. दिल्लीतल्या कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्या या कॉंग्रेस प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला असल्याचे सांगितले.
मधू कोडा हे सप्टेंबर २००६ ते ऑगस्ट २००८ अशी दोन वर्षे झारखंडचे मुख्यमंत्री होते. अपक्ष असूनही मुख्यमंत्रीपद पटकवण्याचा विक्रम त्यांनी केला होता. २००९ साली ते झारखंडाच्या चैवासा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. परंतु या निवडणुकीची प्रचार मोहीम सुरू असतानाच त्यांना खाण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली.
त्यांची पत्नी गीता ही सुद्धा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेली आहे. मधू कोडा हे निवडून आले असले तरी त्यांच्या खासदारकीच्या काळात ते ४४ महिने न्यायालयीन कोठडीत राहिले आहेत. त्यांच्यावर लाच घेऊन लोखंडाच्या खाणीची कंत्राटे दिल्याचा आरोप आहे. त्याशिवाय परदेशात बेकायदा मालमत्ता विकत घेणे, मनीलॉंडरिंग, आयकर बुडवणे असेही आरोप त्यांच्यावर आहेत.
मधू कोडा यांनी २ हजार ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. परंतु चौकशीच्या दरम्यान हा आकडा ४ हजार कोटी असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर एवढे खटले असूनही कॉंग्रेस पक्षाने गीता कोडा आणि त्यांच्या सहा सहकारी आमदारांचा पाठींबा घेतला. त्यांच्याच पाठिंब्यावर सध्या झारखंडमधले झामुमो-कॉंग्रेस आघाडी सरकार उभे आहे.