बलात्काराची प्रेरणा मिळते कोठून

ज्ञानेश्‍वरीमध्ये मनाचे वर्णन करताना ज्ञानेश्‍वरांनी असे म्हटलेले आहे की, ‘वायाचि मन हे नाव, कल्पनाचि सावेव ॥मन नावाचा काही अवयव नाही. एखाद्या माणसाची शरीराची चिरङ्गाड केली तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अवयव सापडतील. हृदय सापडेल, यकृत सापडेल पण मन सापडेल का? ते काही सापडत नाही. कारण मन हे अन्य अवयवासारखा अवयव नाही. बरेचदा असे म्हटले जाते की, प्रेमी जीव एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांचे हृदय जिंकले जाते. प्रेम किंवा अन्य कोणत्याही भावनांचा संबंध आपण हृदयाशी जोडतो. परंतु मानसिक भावनांचा हृदयाच्या निर्मितीशी काही संबंध नाही. भावनांचा प्रक्षोभ झाला की, हृदय धडधड करायला लागते. त्यामुळे हृदयाचा आणि भावनांचा संबंध जोडला जातो. तसा तो प्रत्यक्ष नसतो.

भावनांची प्रतिक्रिया म्हणून रक्तप्रवाह वेगाने पळायला लागतो आणि त्यामुळे हृदय धडधडते. म्हणजे भावना हृदयात निर्माण होत नाहीत, त्याचा परिणाम मात्र हृदयावर होतो. शरीरातल्या सगळ्याच भावनांचे नियंत्रण मेंदूकडून केले जात असते. त्यामुळे काही वेळा मन मेंदूमध्ये असते असे मानले जाते. पण मेंदू ङ्गोडून पाहिला तरी त्यात मन सापडत नाही. आध्यात्मिक भाषेत मनाला अवयव म्हणण्याऐवजी प्रक्रिया म्हटलेले आहे. म्हणून ज्ञानेश्‍वर ‘वायाचि मन हे नाव’. वाया म्हणजे उगाच. मनाला दिलेले नाव उगाच आहे, तो एक अवयव आहे ही एक कल्पना आहे. प्रत्यक्षात मन ही संकल्प विकल्पाची अवस्था आहे. म्हणजे आपण काही तरी ठरवतो, काही तरी जाणतो ही सगळी प्रक्रिया म्हणजे मन आहे.

मन हे समूर्त नाही, ते अमूर्त आहे म्हणजे ते डोळ्यांना न दिसणारे आहे. हे सारे संशोधन जगभर मान्य केले गेलेले आहे. मात्र जर्मनीतल्या एका शास्त्रज्ञाने या विचाराला किंचित धक्का देईल असे एक संशोधन पुढे आणले आहे. त्याने मनाचा ङ्गोटो काही काढलेला नाही, परंतु एखाद्या माणसाच्या मनात वाईट भावना येते तेव्हा त्याच्या मेंदूत काही बदल होतात, असे त्याला आढळले आहे. गेल्या काही दिवसां पासून दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराची चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये, एखाद्या माणसाच्या मनामध्ये बलात्कार करण्याची प्रेरणा येते कोठून, हा प्रश्‍न विचारला जात आहे. मानसशास्त्रज्ञ आणि आध्यात्म शास्त्रज्ञ या विचारांना संस्कार कारणीभूत असतात असे म्हणतात. परंतु जर्मन शास्त्रज्ञ गेरहार्ड रोत याने माणसाच्या मनातली बलात्काराची आणि चोरीची भावना मेंदूच्या एका विशिष्ट भागामध्ये असते आणि तिथून त्याला या दुष्कृत्यांची प्रेरणा मिळते असे म्हटले आहे. यावर अजून बरेच संशोधन होण्याची गरज आहे.

परंतु बलात्काराच्या भावनेचे एक मूर्त स्वरूप या शास्त्रज्ञाला आढळले आहे. या शास्त्रज्ञाने अशा काही दुष्कृत्ये करणार्‍या लोकांच्या विचारांच्या लहरींचे ङ्गोटो काढले आणि त्यांचे विश्‍लेषण केले. ते करत असताना त्याला काही लोकांच्या मेेंदूच्या पुढच्या भागात एक काळसर डाग आढळला. हा निव्वळ डाग नव्हता. साधारण मिलिमीटरचे काही भाग म्हणता येईल एवढ्या जाडीचा चामखिळी सारखे ते प्रोजेक्शन होते. त्याला एक छोटीशी गळू सुद्धा म्हणता येईल. विशेष म्हणजे या डॉक्टरांना जेव्हा ते गळू आणि माणसाच्या मनातल्या दुष्कृत्याच्या भावना यांचा संबंध दिसून यायला लागला. तेव्हा त्याने त्या गळवावर उपचार करायला सुरुवात केली.

जोपर्यंत मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये ते गळू होते तोपर्यंत माणूस गुन्हेगारी प्रवृत्तीचा दिसून आला. शस्त्रक्रिया करून हे गळू काढून टाकल्यानंतर मात्र त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती नियंत्रणात आली. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीने वागण्याची प्रेरणा मेंदूच्या एका भागात मूर्त रुपाने आढळली. मानवी भावनांचे मूर्त रूप सापडले. पण आता प्रश्‍न असा निर्माण झाला आहे की, मनात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीला लागली म्हणून हे गळू तयार झाले की, गळू तयार झाल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली? गळूचा परिणाम होऊन गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते की, गुन्हेगारीचा परिणाम म्हणून गळू वाढते यावर आता खूप गांभीर्याने संशोधन करावे लागणार आहे.

Leave a Comment