मनू शर्मा पॅरोलवर येणार बाहेर

नवी दिल्ली – संपूर्ण देशात गाजलेल्या जेसिका लाल हत्याकांड प्रकरणात दोषी ठरलेला सिध्दार्थ वशिष्ठ ऊर्फ मनू शर्माला दिल्ली उच्च न्यायालयाने पदव्युत्तर परीक्षेसाठी नऊ दिवसाचा पॅरोल मंजूर केला आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी मनू शर्माला २८ डिसेंबर २०१३ ते पाच जानेवारी २०१४ पर्यंत पॅरोल मंजूर केला.

मानवी हक्क विषयात मनू शर्मा पदव्युत्तर परीक्षा देणार आहे. ३० डिसेंबरपासून ही परीक्षा सुरु होत आहे. पोलिसांनी स्थिती अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने पॅरोल मंजूर केला. न्यायालयाने मनू शर्माला चंदीगडमधील केंद्रावर परीक्षा देण्यास मनाई केली असून, दिल्लीतील केंद्रावर परिक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

परीक्षा केंद्र दिल्लीत बदलून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे तिहार तुरुंग प्रशासनाला निर्देश दिले आहेत. मनू शर्मा माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा यांचा मुलगा आहे. १९९९ साली त्याने सर्वांसमक्ष मॉडेल जेसिका लालची गोळया झाडून हत्या केली होती.