सत्य नाकारल्याने संपत नाही

चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून महाराष्ट्रामध्ये राजकीय विश्‍लेषणाला ऊत आला आहे. या विश्‍लेषणांमध्ये आम आदमी पार्टीचे अनावश्यक कौतुक आणि भारतीय जनता पार्टीच्या विजयाकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जात आहे. अशा प्रवृत्तीमुळे त्या विश्‍लेषकांना आनंद वाटत असेल परंतु हे सत्य नाकारल्याने त्यांच्या विश्‍लेषणात वस्तुनिष्ठपणा येणार नाही. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने विजय मिळविल्यापासून देशातले सगळेच राजकीय पक्ष एका वेगळ्या अर्थाने का होईना पण सावध झाले आहेत आणि विचार करायला लागले आहेत. गेले वर्षभर अशा लोकांच्या विचारांचा आणि विश्‍लेषणांचा केंद्रबिंदू नरेंद्र मोदी हा होता. पण आता हा केंद्रबिंदू अरविंद केजरीवाल हा झाला आहे. लोकांना भ्रष्टाचार नको झाला आहे आणि त्यांच्या या भावनेला वाचा फोडण्याचे काम आम आदमी पार्टीने केले असल्यामुळे दिल्लीतल्या लोकांनी या पक्षाला अनुकूल प्रतिसाद दिला आहे. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात होईल का असा प्रश्‍न काही लोकांनी उपस्थित केला आहे. परंतु या प्रश्‍नाचे उत्तर जो तो विश्‍लेषक आपल्या वैचारिक कलाला अनुसरून देत आहे आणि ही भ्रष्टाचार विरोधाची लाट महाराष्ट्रात काही यायची नाही असा विश्‍लेषणाचा निष्कर्ष मांडून आपल्या मनाचे समाधान करून घेत आहे.

विशेषतः आम आदमी पार्टीचे महाराष्ट्रात काही संघटनात्मक बळ नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला आकृष्ट करून घेऊ शकेल असा नेता या पक्षाकडे नाही, महाराष्ट्रातल्या पुरोगामी वगैरे परंपरा फार वेगळ्या आहेत आणि महाराष्ट्राची माती आणि पाणी काही आगळेवेगळेच आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाची डाळ महाराष्ट्रात शिजणार नाही. असा या कथित विश्‍लेषकांचा निष्कर्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनासुध्दा सुखावून जात असेल तर नवल नाही. कोणत्याही पक्षाला त्याची सत्ता राहील अशा निष्कर्षाचे विश्‍लेषण आवडतच असते. त्यामुळे त्यांना खूष करण्यासाठी काही अभ्यासक मंडळी आता महाराष्ट्रामध्ये एकामागे एक विश्‍लेषणे मांडायला लागली आहेत. दिल्लीचे राजकारण महाराष्ट्रात चालत नाही, उत्तर भारतातल्या राजकारणाची ढब वेगळी आहे. महाराष्ट्राची ढब वेगळी आहे त्यामुळे उत्तरेत जे घडते ते महाराष्ट्रात घडत नाही. असा इतिहास आहे त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची सूत्रे अजून काही वर्षे तरी आपल्याच हातात राहतील याविषयी निःशंक असावे असे त्यांना ही विश्‍लेषक मंडळी आश्‍वासन देत आहेत.

उत्तरेतले राजकारण आणि महाराष्ट्रातले राजकारण यात भिन्नता आहे. त्यामुळे उत्तरेत कॉंग्रेसची वाताहत झाली म्हणून तशीच ती महाराष्ट्रातसुध्दा होईल असे म्हणता येत नाही. पण त्यापेक्षा वाईट वाताहत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. उत्तरेप्रमाणे घडणार नाही याचा अर्थ महाराष्ट्रात कॉंग्रेसची सत्ता राहणार असा होत नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाची ही कुंडली मांडताना हे सारे विश्‍लेषक आणि अभ्यासक काही गोष्टी सोयिस्करपणे नजरेआड करत आहेत. चार राज्यातल्या निवडणुकामध्ये भाजपाला मिळालेले यश त्यांनी नजरेआड केले म्हणून कमी ठरत नाही. आम आदमी पार्टीला दिल्लीत २८ जागा मिळाल्या आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीला त्यांच्यापेक्षा ३ जागा जास्त मिळाल्या आहेत. आम आदमी पार्टीने कॉंग्रेसचा धुव्वा उडवला आहे. पण या पक्षाला भाजपाचा धुव्वा उडवता आलेला नाही. राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात आम आदमी पार्टी औषधालासुध्दा दिसत नाही. राजस्थानात कॉंग्रेसची झालेली हार अतीशय नामुष्कीची आहे. २०० सदस्यांच्या विधानसभेत या पक्षाला केवळ २८ जागा मिळाल्या आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने सत्ता राखली आहे आणि ती राखताना कॉंग्रेसच्या जागा कमी केल्या आहेत. कोणत्याही राज्यामध्ये सतत दहा वर्ष सत्ता गाजवली म्हणजे प्रस्थापित विरोध मत काही प्रमाणात आपोआपच निर्माण होत असते. पण त्याचा थोडा का होईना परिणाम सत्ताधारी पक्षावर होत असतो. परंतु भाजपाच्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या सरकारांवर असा परिणाम होणे तर दूरच पण त्यांच्या जागा वाढलेल्या आहेत.

आम आदमी पार्टीच्या दिल्लीतल्या यशामुळे काही विश्‍लेषक एवढे प्रभावित झाले आहेत की भाजपाच्या या यशाकडे दुर्लक्ष करून स्वतःचे समाधान करून घेत आहेत. अशा प्रकारचे विश्‍लेषण ही आत्मवंचना आहे. चार राज्यातल्या निवडणुकात भाजपा नव्हे तर आम आदमी पार्टी विजयी झाली आहे किंवा भाजपाचा विजय झाला असला तरी तो मोदीमुळे झालेला नाही. हे सिध्द करण्याचा आटापिटा ही एक आत्मवंचनाच आहे. त्यांनी कितीही आत्मवंचना केली तरी जनतेला सत्य कळत असते. उत्तरेतला परिणाम महाराष्ट्रात होणार नाही असे म्हटल्याने कदाचित महाराष्ट्रातल्या कॉंग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना तूर्तास शांत झोप लागतही असेल पण महाराष्ट्रातली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची भांडणे इतकी लज्जास्पद आहेत की त्यावरून या राज्यपातळीवरच्या नेत्यांना एकदा चांगला धडा शिकवला पाहिजे अशा महाराष्ट्रातल्या जनतेला तीव्रपणे वाटत आहे. ती धडा शिकवण्याची संधी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारांनी साधली तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. तसे घडणारच आहे. पण तूर्तास महाराष्ट्रातले काही कथित पुरोगामी पत्रकार उत्तरेतल्या लाटेला दुर्लक्षून स्वतःचेही समाधान करून घेत आहेत आणि पवार-चव्हाण जोडीला तूतासर् दिलासा देत आहेत.