लोकपालाविषयी कॉंग्रेसची भूमिका दुटप्पीपणाची

डेहराडून – लोकपाल नियुक्तीच्या बाबतीत कॉंग्रेस पक्षाचे धोरण दुटप्पीपणाची असल्याची टीका भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडाची राजधानी असलेल्या डेहराडूनमध्ये बोलताना केली. डेहराडूनमध्ये शंखनाद रॅली या नावाने त्यांची ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी कॉंग्रेसच्या लोकपालविषयक धोरणांवर टीका केली.

केंद्रात राहुल गांधी लोकपाल विधेयक आणून भ्रष्टाचाराशी मुकाबला करण्याचा मोठा आव आणत आहेत. परंतु कॉंग्रेसच्याच उत्तराखंडातल्या सरकारने लोकायुक्तांची नियुक्ती केलेली नाही. राहुल गांधी यांना केंद्रात लोकपाल नेमून भ्रष्टाचार नष्ट करायचा आहे, मग त्यांच्यात उत्तराखंडातल्या सरकारला भ्रष्टाचाराला धक्का लावायचा नाही का, असा सवाल मोदी यांनी केला.

उत्तराखंडात यापूर्वी सत्तेवर असलेल्या बी.सी. खंडुरी यांच्या भाजपा सरकारने लोकायुक्त नेमले होते. त्यासाठी त्या सरकारने विशेष कायदा मंजूर केला होता आणि त्याची अण्णा हजारे यांनी सुद्धा प्रशंसा केली होती. परंतु उत्तराखंडात सत्तांतर होऊन विजय बहुगुणा यांचे कॉंग्रेसचे सरकार आले आणि या सरकारने खंडुरी यांच्या भाजपाच्या सरकारचा लोकायुक्त कायदा गुंडाळून ठेवला हे मोदी यांनी नजरेस आणून दिले.