नवी दिल्ली – चिनी सैनिकांनी काल लडखाच्या चुमार भागात घुसखोरी केली आणि तिथल्या पाच भारतीयांना पळवून नेले. चीनने आजवर अनेकदा घुसखोरी केली आहे पण भारतीयांना पकडून नेण्याचा प्रकार पहिल्यांदाच केला. नंतर भारतीय आणि चिनी अधिकार्यांत बोलणी होऊन या पाच जणांना सोडून देण्यात आले. हे पाच जण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत भारतीय प्रदेशात जनावरे चारत होते पण त्यांना पकडून चिन्यांनी हा प्रदेश आपला असल्याचा दावा केला.
हा प्रकार घडलेला भाग भारतीय हद्दीच्या बराच आत आहे. पण तरीही तिथपर्यंत घुसखोरी करून चिन्यांनी हा गैरप्रकार केला. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी या प्रकाराला फार महत्त्व नसल्याचे म्हटले आहे. पण स्थानिक अधिकार्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला आणि संयुक्त बैठकीची मागणी केली.
चिनी सैनिकांनी पाच भारतीयांना सोडले नाही तर हा विषय फार वरिष्ठ स्तरावर नेला जाईल असा इशारा भारतीय अधिकार्यांनी दिला म्हणून चिनी सैनिकांनी भारतीयांना सोडले आणि चुमार भागातून आपले बस्तान हलवले. भारत आणि चीन यांच्या दरम्यान गेल्या ऑक्टोबर मध्ये या संबंधात करार झाला आहे आणि असे काही प्रकार घडले तर निर्माण झालेला तणाव उभयपक्षी चर्चा करून सोडवला जाईल असे ठरले आहे.
हा करार झाला तेव्हा संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी मात्र सावध प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि करार झाला असला तरीही अप्रिय प्रकार घडणारच नाहीत याची काही शाश्वती देता येत नाही असे म्हटले होते. अँटनी यांच्या या प्रतिक्रियेची आठवण आज होत आहे.
लडाखमधला चुमार भाग हा नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. तिथून प्रत्यक्ष नियंत्रण रेषाच जात नाही. त्यामुळे चिनी सैनिक नेहमीच घुसखोरी करीत असतात. चिनी सैनिकांनी गेल्या वर्षभरात या भागात दोनशे वेळा घुसखोरी केली आहे. गेल्या एप्रिलमध्ये तर त्यांनी या भागात चक्क तंबू ठोकले होते.