पराभवाच्या क्षणी विश्‍लेषणात संयम हवा

निवडणुका पार पडून त्यांच्यात पराभव झाला की, सगळ्यांनाचनैराश्य येते आणि त्या मनस्थितीत पराभूत पक्षामध्ये अपयशाची कारणे शोधण्याचे काम सुरू होते तेव्हा ते वस्तुनिष्ठ असतेच असे नाही. ते फार नेमकेपणाने होणे शक्य नसते कारण ते विचाराच्या आहारी जाऊन केलेले असते. काही लोक त्या निमित्ताने आपले वैयक्तिक रागलोभ व्यक्त करून घेत असतात. पराभवाचे जबाबदार कोणाला धरायचे यावरून संघर्ष सुरू होतो. तसा कॉंग्रेसमध्ये सुरू झाला आहे. मध्य प्रदेशामध्ये कॉंग्रेसचा पराभव होण्यामागे दिग्विजय सिंग यांचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे खासदार सत्यव्रत चतुर्वेदी यांनी केला आहे. दिग्विजय सिंग यांनी मध्य प्रदेशात भावी मुख्यमंत्री म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव लवकर जाहीर होऊ दिले नाही. निवडणुकीच्या आधी केवळ दोन महिने हे नाव जाहीर झाले आणि त्यामुळे पक्षाचा पराभव झाला, असे चतुर्वेदी यांचे म्हणणे आहे. एखाद्या निवडणुकीमध्ये उमेदवारांची निवड, त्या पक्षाची कर्तबगारी, वातावरण, जातीय समीकरणे आणि नेतृत्व करणार्‍यांची कुवत या घटकांचा कमी अधिक परिणाम होऊन निवडणुकीचा ठरत असतो. चतुर्वेदी यांचे विश्‍लेषण चुकीचे आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव उशिरा जाहीर झाले म्हणून निवडणूक हरलो हे विश्‍लेषण पटत नाही. ते नाव सहा महिने आधी जाहीर केले असते तर निवडणूक जिंकता आली असती अशी खात्री चतुर्वेदी देऊ शकतील का ? निवडणुकीत पराभव झाला म्हणजे अशी अतार्किक विश्‍लेषणे मांडली जात असतात आणि त्यातून कोणाला तरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असतो. शरद पवार यांनी आता या पराभवाचे खापर दुबळ्या नेतृत्वावर फोडले आहे. परंतु २००९ साली या दुबळ्या नेतृत्वाने लोकसभेची निवडणूक चांगल्यापैकी जिंकून दाखवलेली आहे. हे पवारांच्या लक्षात राहिलेले दिसत नाही. मणिशंकर अय्यर हे सुध्दा आता पुढे आले आहेत. त्यांनी तर कॉंग्रेसला असा एक डोस पाजला की जो कॉंग्रेसच्या गळी उतरणे शक्यच नाही. कॉंग्रेस पक्षाने एकदा पराभव पत्करून विरोधी पक्षात बसावेच, त्यानिमित्ताने पक्षसंघटना मजबूत होईल आणि मग विजय मिळविता येईल, असे अय्यर यांचे म्हणणे आहे. विरोधी बाकावर बसण्याची कल्पना कॉंग्रेसच्या नेत्यांना कधीच पेलवत नाही.

दिल्लीत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षांनी काही तात्विक मुद्यांवरून का होईना पण विरोधी बाकावर बसण्याची तयारी दाखवली आहे. कॉंग्रेसला मात्र केवळ आठ जागा मिळाल्या आहेत. तरीही त्यांचा वापर करून आपल्याला सत्तेवर कसे येतात येईल याची कॉंग्रेसचे नेते धडपड करायला लागले आहेत. इतकी त्यांना सत्ता प्रिय असते. त्यामुळे मणिशंकर अय्यर यांची सूचना कुणी मनावरसुध्दा घेणार नाही. छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव का झाला. यावर तर फार हिरिरीने चर्चा होत आहे. कारण तिथला कॉंग्रेसचा विजय अगदी थोडक्यात निसटला आहे. खरे तर बस्तर भागातल्या बारा जागांपैकी सात जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. पूर्वी एकच जागा मिळाली होती आणि या राज्यातल्या बहुमतासाठी जी काट्याची टक्कर होत असते तिच्यामध्ये सात आमदार ही संख्या फार मोठी ठरते. पण बस्तरमध्ये विजय मिळवूनसुध्दा कॉंग्रेसला सत्ता मिळवता आलीच नाही. त्यामुळे फार हळहळ व्यक्त होत आहे आणि या थोडक्यात पराभवाला जबाबदार कोण यावर तिथे लठ्ठालठ्ठी सुरू झाली आहे. छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने पूर्वीच्या सभागृहातल्या सर्व ३८ आमदारांना तिकिट दिले होते. त्यातले २७ आमदार पराभूत झाले. तिथली सत्ता थोडक्यात हातून निसटली. या पराभवापेक्षा हे २७ विद्यमान आमदार पराभूत झाले ही गोष्ट अधिक धक्कादायक ठरलेली आहे आणि विशेष म्हणजे या २७ आमदारांच्या पराभवाला कॉंग्रेस पक्षाचेच नेते जबाबदार आहेत असा आरोप कॉंगे्रसचेच नेते करत आहेत.

माजी मुख्यमंत्री असलेले अजित जोगी हे या पराभवास कारणीभूत आहेत, असा उघड आरोप आता होत आहे. एकंदरीत कॉंग्रेस पक्षातली दुही आणि बेदिली संपायला तयार नाही. पराभव झाल्यानंतर ती अधिक उफाळून वर येते आणि त्यातून होणार्‍या आरोप प्रत्यारोपातून पक्षाची अवस्था अजून वाईट होते. शरद पवार यांनी निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली तेव्हा कॉंग्रेसच्या एका नेत्याने असे माध्यमातून बोलणे योग्य नाही असा टोमणा मारला. परंतु आता कॉंंग्रेसचा प्रत्येकच नेता थेट माध्यमापुढेच जाऊन आपली मते मांडायला लागला आहे. अशी मते मांडणार्‍यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची हिंमत पक्षश्रेष्ठींमध्ये राहिलेली नाही. प्रत्येक नेता आपल्या मनाचा अधिकारी झालेला आहे. पराभवाच्या क्षणी याबाबत संयम पाळला पाहिजे हे त्यांना कळत नाही. जे लोक पराभवाच्या क्षणी मनाचा समतोल राखून आत्मपरीक्षण करतात तेच पुन्हा विजय मिळवू शकतात. हे विसरता कामा नये. त्या उलट स्थिती असते ती विजयी होणारांची. विजयाच्या आनंदात काही लोकांना आत्मपरीक्षणाची गरज वाटत नाही. पण विजयातही काही अपयशाची कारणे लपलेली असतात. ती समजून घेतली नाहीत तर विजयाचे रूपांतर पराजयात व्हायला काही वेळ लागत नाही.