माथेफिरू संतोष मानेची फाशीची शिक्षा कायम

पुणे : पुण्यातील स्वारगेट स्थानकातून एसटी बस ताब्यात घेऊन बेदरकारपणे चालवून रस्त्यावर मृत्यूचे थैमान घालणारा चालक संतोष मारुती माने (वय ४०,
रा. कैठाले, जि. सोलापूर) याची फाशीची शिक्षा आज (बुधवार) पुणे सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांत त्याला आरोपी ठरविण्यात आले आहे.

एसटीचालक असलेल्या संतोष माने याने २५ जानेवारी २०१२ रोजी पुण्यात बेदरकारपणे एसटी चालवली होती. त्यात नऊ जण ठार झाले तर ३५ जण गंभीर जखमी झाले होते. यापूर्वी पुणे सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याने फाशीच्या शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर झाली. आरोपीस शिक्षा देण्यापूर्वी काहीही विचारले नाही, ही अत्यंत गंभीर चूक आहे. न्यायालयाने त्याचे म्हणणे ऐकून घेणे बंधनकारक होते हे निदर्शनास आणून देऊन त्याची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी संतोष मानेचे वकील जयदीप माने यांनी खंडपीठाकडे केली.

मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली आणि हा खटला शिक्षेबद्दलच्या फेरचौकशीसाठी पुणे न्यायालयात वर्ग केला होता. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०१३ पासून खटल्याच्या फेरचौकशीला सुरवात झाली. आरोपी मनोरुग्ण आहे व तो जबाब देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे की नाही याची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी आरोपीतर्फे ऍड. धनंजय माने यांनी केली. त्यानुसार येरवडा मेंटल हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांच्या पथकाने संतोष माने याची तपासणी केली.

आरोपीच्या शिक्षेबद्दलच्या पुराव्याची सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली. ६ डिसेंबर रोजी ऍड. धनंजय माने व सरकारी वकील उज्ज्वला पवार यांचे युक्तिवाद पूर्ण झाले. आज अखेर पुणे सत्र न्यायालयात आरोपी संतोष माने याची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. यापूर्वी २५ जानेवारी २०१२ ते ३ मार्च २०१३ या १४ महिने १४ दिवसांच्या कालावधीत या खटल्याचा निकाल लागला होता. तू निर्दयपणे नऊ जणांचा बळी घेतल्यामुळे तुला फाशीची शिक्षा देण्यात येत आहे,’ असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी संतोष मानेला सांगितल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचे काहीही भाव बदलले नव्हते. तो आरोपीच्या पिंजर्‍यात निर्विकारपणे उभा होता. पश्‍चात्तापाचा साधा लवलेश शिक्षा झाल्यावर किंवा खटल्याची सुनावणी सुरू असतानाही त्याच्या चेहर्‍यावर दिसून आला नाही.