‘जय हो’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी आता अभिनेता सलमान आणि सोहेल ‘खान’ बंधू कामाला लागले आहेत. शुटिंगमुळे लांबत गेल्यामुळे सलमानच्या ‘जय हो’ सिनेमाला प्रसिध्दीसाठी उसंतच सापडत नव्हती. ‘धूम ३’साठी तर यशराजने चार ते पाच महिने आधीपासून सुरुवात केली होती. मात्र, अखेर सलमानने त्यांशच्या प्रसिध्दीसाठी मुहूर्त सापडला आहे. आगामी काळात कमीतकमी वेळात प्रभावी प्रमोशनसाठी वेगळा फंडा निवडला आहे.
सोहेल खान दिग्दर्शित करत असलेल्या ‘जय हो’चे सिनेमाचे काही ना काही कारणांमुळे सतत लांबले गेले. त्यामुळे पोस्ट प्रॉडक्शनचे सोपस्कार पूर्ण करून सिनेमाच्या प्रसिध्दीचे नियोजन करायला निर्मात्यांकडे वेळच उरलेला नाही. मात्र, गेले वर्षभर सिनेमापासून लांब राहिलेल्या सलमानला काहीही करून ‘जय हो’ साठी पध्दतशीर नियोजन आवश्यक आहे. त्यात ‘जय हो’मध्ये सलमानबरोबर डेझी शाह आणि सना खान या दोन नवीन अभिनेत्री, तब्बू अशी मोजकीच नावे असली तरी सलमान वगळता यातले कुठलेच नाव ‘हमखास यशस्वी’ शिक्का असलेले नाही. त्यामुळे ‘जय हो’चा संपूर्ण डोलारा सलमानवर असल्या कारणाने ‘दबंग’ खानला यावेळी आपल्या सिनेमाची पूर्वप्रसिध्दी करावीच लागेल, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सलमानने आता सर्व काही मनावर घेतले आहे. पुढच्याच आठवडय़ात ‘जय हो’चा ट्रेलर लॉंच करण्यात येणार आहे. मात्र, कमीतकमी वेळात लोकांपर्यंत सिनेमा पोहोचवायचा असल्याकारणाने नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद वगैरे न घेता थेट चाहत्यांना आवाहन करण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे. जुहू येथील ‘चंदन’ चित्रपटगहात सलमानच्या चाहत्यांच्या उपस्थितीत या सिनेमाचा ट्रेलर दाखवण्यात येणार आहे.