सूरत – नारायण साईला आश्रमातील तरुणींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली बुधवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. चौकशी करायची असल्याने नारायण साईला घेऊन गुजरात पोलिस सूरतमध्ये दाखल झाले आहेत. सूरत पोलिसांनी ४० वर्षीय साईला बलात्कार, अनैसर्गिक संबंध, विनयभंग, शस्त्राचा धाक दाखवून धमकावणे आणि गुन्हेगारी कारस्थान रचणे अशा विविध कलमांखाली अटक केली आहे.
अटक टाळण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून पळणा-या नारायण साईला बुधवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी दिल्ली-हरयाणा सीमेवर त्याच्या दोन सहका-यांसह अटक केली होती. नारायण साईची पोलिस कोठडी मिळवण्यासाठी त्याला गुजरात सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी नारायण साईला सूरतला आणल्याची माहिती पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिली.
बुधवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी नारायण साईच्या गाडीचा पाठलाग करुन, नारायण साईसह हनुमान (२९) आणि चालक रमेश मल्होत्रा (२७) या दोघांना अटक केली होती. दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने बुधवारी गुजरात पोलिसांना साई आणि त्याच्या दोन सहका-यांचा २४ तासांसाठी ट्रान्झिस्ट रिमांड दिला होता. सूरतमधील दोन बहिणींनी नारायण साई आणि त्याचे वडिल स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू विरोधात बलात्कार, लैंगिकछळ आणि अन्य आरोपांखाली तक्रार दाखल केली आहे.