ठाणे – ठाणे जिल्ह्याच्या भाईंदरमधील उच्चभ्रूंच्या गोल्डन नेस्ट अपार्टमेंटमध्ये राहणार्या एका इसमाने आपल्या पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तिचा भोसकून खून केला आणि त्याने पत्नीच्या शरीराचे तीन तुकडे करून, ते आपल्याच फ्लॅटमध्ये ठेवल्याचा भीषण प्रकार उघडकीला आला असून पोलिसांनी या इसमाला अटक केली आहे.
गिरीश पोटे, असे या इसमाचे नाव असून तो 29 वर्षीय आहे. त्याचे आपल्या पत्नीशी विविध कारणांवरून सतत भांडण होत असे. यात पैशाच्या कारणाचाही वाद होता. भांडण विकोपाला गेल्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा वार करून खून केला आणि तिच्या देहाचे त्याने तुकडे तुकडे केले. शेजारी राहणार्या लोकांनी तसेच आरोपीच्या पुतण्याने हा प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी घरी जाऊन तपास केला असता वरील प्रकार उघडकीला आला. पोलिसांनी पोटेला खुनाच्या गुन्ह्या खाली अटक केली आहे.