मोदी मॅजिक चलेगा – कमल खिलेगा

नवी दिल्ली – उत्तरेतल्या चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळेल, असा निष्कर्ष एक्झिट पोल (मतदानोत्तर चाचणी) मधून निघाला आहे. या चारही राज्यातील मतदारांनी मतदान केल्यानंतर काही संस्थांनी केलेल्या पाहणीत भाजपाला मध्य प्रदेश आणि राजस्थानात उल्लेखनीय यश मिळेल आणि तिथे कॉंग्रेसची मोठी पिछेहाट होईल असे दिसून आले आहे.

भारतीय जनता पार्टी या आधी मध्य प्रदेशात दोन वेळा सत्तेवर आलेले आहे. म्हणजे आता निवडणूक जिंकल्यास या पक्षाची हॅटट्रीक होणार आहे. छत्तीसगडमध्येही भाजपा हॅटट्रीक करेल, परंतु तिथला भाजपाचा विजय निसटता विजय असेल. राजस्थानात भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमत मिळवून कॉंग्रेसकडून सत्ता हिसकावून घेईल, असेही या एक्झिट पोलमधून दिसून आले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या मुसंडी मारण्याने सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. तिथे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने कॉंग्रेसची मते खाल्ली असल्यामुळे भारतीय जनता पार्टी तिथे १५ वर्षानंतर सत्तेच्या जवळ जाण्यात यशस्वी होणार आहे. शिवाय भारतीय जनता पार्टीने तिथे आपल्या मतदानाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ केलेली दिसेल, असेही आढळले आहे. एकंदरीत या चार राज्यांमध्ये मोदी मॅजिकचा परिणाम कॉंग्रेसला भोगावा लागेल असे दिसते.

कॉंग्रेससाठी त्यातल्या त्या समाधानाची बाब अशी की, मिझोराम होणार असणार्‍या निवडणुकीत हा पक्ष एकूण ४० जागांपैकी १९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. चार राज्यातील निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने मोठ्या ताकदीनिशी उतरून आपली शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी या पक्षाला ङ्गारसे यश मिळणार नाही, असे मतदानोत्तर चाचणीतून आढळले आहे.