श्रीनगर – जम्मु काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात भारतीय लष्कर व पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आल्याचे वृत्त आज (मंगळवार) सूत्रांनी दिले. हंडवारा येथील शांतिपोरा गावामध्ये झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाले, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
या दहशतवाद्यांची ओळख तातडीने पटू शकली नाही; मात्र हे दहशतवादी लष्करे तैयबा या पाकमधील दहशतवादी संघटनेशी संबंधित असावेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. यावेळी घटनास्थळी तीन एके रायफल्स सापडल्या. त्याचबरोबर दहशतवादी लपल्याचे ठिकाणही यावेळी उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर व पोलिसांनी काल (सोमवार) येथे कारवाईस सुरुवात केली होती. या भागात शोध घेत असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावर सुरक्षा दलांनीही यास प्रत्युत्तर दिले व या दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.