पुण्यातीलही एका शिवसैनिकाची हकालपटी

पुणे-माजी खासदार आणि चार दशके शिवसेनेत सक्रीय राहिलेल्या मोहन रावले यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला असताना पुण्यातही उप जिल्हाप्रमुख असलेल्या एका 29 वर्ष जुन्या सैनिकाची हकालपट्टी करण्यात आल्याने निष्ठावंत सैनिकांमध्ये पक्ष नेतृत्वाबद्दल नाराजीची लाट पसरली आहे.

शिवसेना हा दलालांचा पक्ष बनला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हा पक्ष संपवायला निघाला आहे. त्याला पक्ष नेतृत्व पाठीशी घालत आहे, अशा आरोपांच्या फैरी झाडणार्‍या मोहन रावले यांची त्याचक्षणी उद्धव यांनी पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे मुंबईत रावलेंसारखे असंख्य निष्ठावंत दुखावलेत. हे वादळ अद्याप शमलेले नसताना नाराजीचे लोण पुण्यातही पसरले आहे.

पुणे उप जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांची पक्षातून तडकाफडकी करण्यात आलेली हकालपट्टी हे या नाराजीचे कारण ठरले आहे. खांडेभराड हे गेल्या 29 वर्षापासून सेनेत कार्यरत होते. त्यांनी पुण्यात पक्षवाढीसाठी सतत प्रयत्न केले. मात्र, सहसंपर्कपदाची नियुक्ती करताना पक्षाने त्यांना डावलले. त्यांच्याऐवजी चार वेळा पक्ष बदलून काही दिवसांपूर्वीच सेनेत आलेल्या अविनाश रहाणे यांना हे पद देण्यात आले. त्यामुळे नाराज असलेल्या खांडेभराड यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.

पुण्यातील निष्ठावंत सैनिकांवर अन्याय सुरू असून त्याला खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील जबाबदार आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या उघड बंडामुळेच पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, पक्षात अशाप्रकारे मनमानी कारभार सुरूच राहिल्यास पुण्यात येत्या काळात पक्षाला मोठे खिंडार पडेल, असेही खांडेभराडे यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment