नवी दिल्ली – डिझेलच्या दरात शनिवार रात्रीपासून लिटरमागे ५० पैसे एवढी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात मात्र कसलीही वाढ झालेली नाही. गतवर्षी केंद्र सरकारने डिझेल कंपन्यांना डिझेलचे दर दरमहा ५० पैसे प्रती लिटर या प्रमाणे वाढविण्याची अनुमती दिली होती. तेव्हापासून झालेली ही अकरावी वाढ आहे.
डिझेलच्या या दरातली वाढ लिटरमागे ५० पैसे असली तरी त्या ५० पैशावर लागणारा मूल्यवर्धित कर आणि स्थानिक विक्री कर हा त्यात समाविष्ट नाही. त्यामुळे देशात विविध ठिकाणी डिझेलच्या किंमतीतली वाढ कमी-जास्त आहे. दिल्लीमध्ये ही वाढ ५७ पैसे एवढी आहे. दिल्लीत आता डिझेलचा दर ५३ रुपये ६७ पैसे प्रती लिटर तर मुंबईत ६० रुपये ७० पैसे प्रती लिटर असा राहणार आहे.
पेट्रोलच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरवाढीनुसार वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि चालू महिन्यात पेट्रोलची सुद्धा दरवाढ लिटरमागे २५ ते ३० पैसे एवढी करण्याची गरज आहे. परंतु तूर्तास तरी ही वाढ न करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. पेट्रोलच्या दरातली ही वाढ रुपयाच्या घसरत्या किंमतीमुळे आवश्यक ठरली आहे.