इशरत प्रकरणाच्या आरोपपत्रात अमित शहा नाहीत

नवी दिल्ली – अहमदाबाद शहराजवळ २००४ साली झालेल्या इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणाचा सीबीआयने तपास केला असून आरोपपत्र तयार करत आणले आहे. परंतु या आरोपपत्रात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे विश्‍वासू सहकारी अमित शहा यांच्या नावाचा समावेश नाही. या पुरवणी आरोपपत्रात या चकमकीमागचा कटावर अधिक भर देण्यात आला आहे आणि ते येत्या सोमवारी सादर केले जाणार आहे.

सीबीआयच्या अधिकार्‍यांनी या बातमीला दुजोरा दिला. ही चकमक घडली तेव्हा अमित शहा हे गृहमंत्री होते. त्यांचा या चकमकीमागे हात आहे का किंवा चकमकीसाठी रचण्यात आलेल्या कटाची प्रेरणा त्यांनी दिलेली आहे का, याचा तपास केला गेला. परंतु कोठेही अमित शहा यांचा संबंध नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या नावाचा समावेश या पुरवणी आरोपपत्रात करण्याचे काही कारण नाही असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

या संबंधात सीबीआयच्या अधिकार्‍यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात अमित शहा यांची चौकशी केली होती. सीबीआयने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर सादर केलेल्या पहिल्या आरोपपत्रात ही चकमक बनावट असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर या चकमकीमागे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा काही संबंध आहे का, याचा तपास करून पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे. परंतु याही आरोपपत्रात या दोघांच्या नावाचा समावेश नसेल.

Leave a Comment