अबू सालेमला सात वर्षांची शिक्षा

हैदराबाद- कुख्यात गुन्हेगार अबु सालेम याला बनावट पासपोर्ट प्रकरणी हैदराबाद येथील विशेष सीबीआय न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायाधीश एम. व्ही. रामन्ना नायडू यांनी गुरुवारी सालेमला सक्त मजूरीच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत सालेमचा हात होता. या बॉम्बस्फोटांमध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सालेमने आंध्र प्रदेशातील करनूल येथून बनावट पासपोर्ट बनवून विदेशात पलायन केले होते. त्यानंतर 2005 मध्ये पोर्तुगालशी प्रत्यार्पण करार करून त्याला भारतात आणण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान, सालेमची पत्नी समीरा आणि पूर्वीची प्रेयसी अभिनेत्री मोनिका बेदी हिच्यावरही बनावट पासपोर्ट बनवल्याचा आरोप होता. मात्र, दोघींचीही याआधीच या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली आहे.