सचिनचे कौतुक थांबवण्यासाठी प्रसारमाध्यमांना तालिबानची धमकी

इस्लामाबाद- क्रिकेटचा देवफ अशी ओळख असलेल्या विक्रमवीर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर जगभरातील प्रसारमाध्यमांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र सचिन भारतीय असल्याने त्याचे कौतुक यापुढे करु नये, भविष्यात असे झाल्यास महागात पडेल, अशी धमकी तालिबानी संघटनेने पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांना दिली आहे.

तालिबानच्या एका बुरखाधारी प्रवक्त्याने एका व्हिडीओद्वारे ही धमकी दिली आहे. सचिनचे कौतुक करु नका. तो भारतीय आहे. भारतीय खेळाडूचे कौतुक करणे हे राष्ट्रविरोधी कृत्य आहे. कौतुक करायचेच असेल तर मिसबाह उल हकचे करा, तो चांगला खेळत नसला तरी तो पाकिस्तानी आहे, असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे.

दरम्यान, तालिबानच्या या धमकीवर पाकिस्तानमधील पत्रकारांनीच टीका केली आहे. त्यांच्या अशा धमकीला आम्ही कधीच भीक घालणार नाही, असे पाकिस्तानमधील वरिष्ठ पत्रकार आमिर गौरी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील डॉन, एक्स्प्रेस ट्रिब्यून, डेली टाइम्स या प्रमुख इंग्रजी आणि अन्य उर्दू वर्तमानपत्रामधून सचिनची भरभरुन स्तूती केली. पाकिस्तानी टीव्हीवरही सचिन चांगलाच झळकला. त्यामुळे तालिबान्यांच्या पोटात दुखू लागले आहे.

Leave a Comment