कुडनकुलम प्रकल्पविरोधी आंदोलनाच्या नेत्याविरुद्ध गुन्हा

चेन्नई – तमिळनाडूतील एका गावात काल झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात सहा जण मृत्युमुखी पडले. याप्रकरणी कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाचे नेते एस. पी. उदयकुमार यांच्यासह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कुडनकुलम प्रकल्पाजवळ असलेल्या इदिंथाकराई गावात काल सायंकाळी झालेल्या स्फोटानंतर खळबळ उडाली. काही गुन्हेगार त्यांच्या झोपडीत बॉम्ब बनवत असताना हा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. स्फोटाच्या या घटनेनंतर तातडीने कारवाई करताना पोलिसांनी उदयकुमार, त्यांचे दोन सहकारी आणि इतर काही जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र, स्फोटाशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा उदयकुमार यांनी केला आहे.

दरम्यान, काल स्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांना दोन जिवंत बॉम्ब सापडले. हे बॉम्ब तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. स्फोट प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. कालच्या स्फोटानंतर कुडनकुलम प्रकल्पाभोवतीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. हा प्रकल्पाचे कामकाज सुरळीतपणे चालू असल्याचे सांगण्यात आले.