आग्रा – आग्रा येथे नुकत्याच पार पडलेल्या भाजप रॅलीत नरेंद्र मोदी ज्या खुर्चीवर बसले होते ती खरेदी करण्यासाठी भाजपत रस्सीखेच सुरू झाल्याचे वृत्त आहे. पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे आमदार जगनप्रसाद गर्ग यांनी या खुर्चीसाठी सव्वा लाख रूपये देण्याची तयारी दर्शविली आहे तर अन्य दोघे, आमदार योगेंद्र उपाध्याय व खासदार रामशंकर कठोडिया यांनी १-१ लाख रूपये देण्याची तयारी दर्शविली आहे.
भाजप रॅलीसाठी फर्निचर पुरविणारे भाजपचेच कार्यकर्ते असलेले ठेकेदार प्रमोद उपाध्याय यांनी या किमती ऐकून खुर्ची विकत देणार नसल्याचे जाहीर केले आहे. एका पार्टी कार्यकर्त्याने मोदी यांनी विजय शंख नाद रॅलीत वापरलेली खुर्ची या ठेकेदाराकडे मागितली होती व त्याने नकार देताच खुर्ची साठी दोन हजार रूपये देण्याची तयारी दाखविली होती. ही वार्ता समजताच अन्य नेत्यांनी खुर्चीच्या खरेदीसाठी चढाओढ सुरू केली. परिणामी ही किंमत वाढून सव्वा लाखांवर गेली असल्याचेही समजते.