नवी दिल्ली – तरुण तेजपाल यांनी सहकारी महिला पत्रकाराचा केलेल्या लैंगिक छळाप्रकरणी गोवा पोलिसांनी रविवारी पुन्हा तहलकाच्या तीन कर्मचा-यांची चौकशी केली. तसेच तहलकाच्या कार्यालयातील काही दस्ताऐवज व संगणकाची हार्ड डिस्क पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र त्रिसदस्यीय पोलिसांचे पथक तेजपालची कोणतीही चौकशी न करता पणजीहून दिल्लीला आल्याचे अहवालावरून सांगण्यात येत आहे.
तहलका मासिकाच्या व्यवस्थापकीय संचालक शोमा चौधरी यांची पोलिसांनी शनिवारी दक्षिण दिल्लीतील मासिकाच्या कार्यालयात तब्बल नऊ तास चौकशी केली. दुपारी चार वाजून 45 मिनिटांनी सुरू केलेली ही चौकशी पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होती. या चौकशीनंतर पोलिसांनी शोमा यांचा मोबाइल फोन, आय पॅड, लॅपटॉप जप्त केले असून, त्यांचे तेजपाल यांचे सीपीयूही जप्त केला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने पीडित तरुणीला सुरक्षा पुरवण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. जेणेकरून पीडित महिला पुढे येऊन आपली तक्रार ठामपणे सांगू शकते असे राष्ट्रीय महिला आयोगातर्फे सांगण्यात आले. पीडित मुलगी ही खोटे बोलत असून, आपल्याला अडकवण्यात येत असल्याचे तेजपालचे म्हणणे असल्याचे सांगण्यात येत आहे.