हैदराबाद – भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे संपूर्ण देशाचे आहेत. गुजरातमध्ये पटेल यांचा भव्य पुतळा उभारून भाजप देशाच्या पहिल्या उपपंतप्रधानांच्या वारशावर हक्क सांगण्याचा प्रयत्न करत नसल्याचे स्पष्टीकरण आज ज्येष्ठ भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी दिले.
ते म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर एकाच पक्षाचा हक्क नाही. काही लोक भाजपची पटेल यांच्या वारशावर हक्क सांगण्याची इच्छा असल्याचा दावा करत आहेत. मात्र, आमची तशी इच्छा नाही. पटेल हे संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे, देशाने त्यांच्या वारशावर हक्क सांगावा, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेसनेही पटेल यांच्याबाबत हे करावे. पटेल यांनी केलेल्या महान कार्याबाबत बोलावे. पटेल यांच्या भाषणांबाबत तरुण, नव्या पिढीला सांगण्याचे आवाहनही नायडू यांनी केले.
गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्याच्या प्रकल्पासंदर्भात बोलावण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होतेे. लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याऐवजी पटेल यांचा पुतळा उभारण्याची गरज आहे का, याविषयी बोलताना नायडू म्हणाले की, अन्नासारख्या मूलभूत सुविधांची काळजी घ्यायला हवी. मात्र, सरदार पटेल हे एकता आणि शांतीचे प्रतीक असल्यामुळे त्यांचे स्मरण आवश्यक आहे.