कतारमध्ये होतेय कामगारांचे बेसुमार शोषण

बहरिन- कतारमध्ये कामगारांना गुराढोरांप्रमाणे वागवण्यात येत असून, त्यांच्या राहण्याची ठिकाणेही अतिशय अस्वच्छ असल्याचे मानवी हक्क संघटना अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने म्हटले आहे.

कतारला 2022च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद मिळाले आहे. त्यानुसार, संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात येत आहे. स्टेडियम, रस्ते, हॉटेल यांसारख्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर वेगाने सुरू आहे. हे बांधकाम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कामगार आयात करण्यात आले. चार पैसे मिळण्याच्या अपेक्षेने आलेल्या या कामगारांची अवस्था मात्र एखाद्या नरकात पडल्यासारखी झाली आहे.

या कामगारांना गुराढोरांप्रमाणे वागवण्यात येत असून, त्यांच्या राहण्याची ठिकाणेही अतिशय अस्वच्छ असल्याचे मानवी हक्क संघटना अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने म्हटले आहे. तसेच कामगारांच्या या परिस्थितीस संपूर्णपणे जागतिक फुटबॉल संघटनाच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कतारमधील स्थलांतरित कर्मचा-यांना देण्यात येणा-या वागणुकीवर अ‍ॅम्नेस्टी या संघटनेसह ब्रिटनचे गार्डियन हे वृत्तपत्र आणि इंटरनॅशनल ट्रेड युनियन कॉन्फेडेरेशनने कडाडून टीका केली आहे.

कतारमधील जवळपास 210 परदेशी कामगारांची अ‍ॅम्नेस्टीतर्फे ऑक्टोबर 2012 आणि मार्च 2013 मध्ये मुलाखत घेण्यात आली होती. तसेच बांधकाम क्षेत्रातील 22 कंपन्यांसोबत बैठका घेतल्या आणि सरकारी प्रतिनिधीतर्फेही चर्चा करण्यात आली. यातूनच हे सत्य बाहेर आल्याचे अ‍ॅम्नेस्टीकडून सांगण्यात आले.

नुकतेच संयुक्त राष्ट्र संघाने कतारमधील काफला व प्रायोजकत्व रद्द करण्याचे आदेश दिले होते. अनेक आखाती देशांमध्ये असलेल्या या पद्धतीनुसार, कामगारांना त्यांच्या प्रायोजकाच्या परवानगीशिवाय नोकरी किंवा देश सोडता येत नाही. काफला पद्धत बंद करण्यासंदर्भात अ‍ॅम्नेस्टीतर्फे कतारचे पंतप्रधान, कामगार मंत्री आणि अन्य अधिका-यांची भेट घेतली पण कोणीही ही पद्धत बंद करण्यासंदर्भात कोणीही सहमती दर्शवली नसल्याचे सलिल यांनी सांगितले.

कतारमधील कामगारांना एकही दिवस सुट्टी न घेता रोज 12 तास राबवण्यात येते. तसेच अस्वच्छ वसतिगृहे, एकाच खोलीत अनेक कामगारांना दाटीवाटीने ठेवण्यात येते, घराशेजारी वाहते गटार, अशा भयानक परिस्थितीमध्ये त्यांना ठेवण्यात येत असल्याचे अ‍ॅम्नेस्टीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.