कॅश फॉर व्होटप्रकरणी अमर सिंहाना दिलासा

नवी दिल्ली – संपूर्ण देशात गाजलेल्या 2008 सालच्या कॅश फॉर व्होट प्रकरणात समाजवादी पार्टीचे माजी सरचिटणीस अमर सिंह, लालकृष्ण अडवाणींचे माजी सहाय्यक सुधींद्र कुलकर्णी, दोन भाजप खासदार आणि दोन अन्य दोन जणांना दिल्ली न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणताही ठोस पुरावा नसल्याने शुक्रवारी न्यायालयाने या सर्वांची निर्दोष सुटका केली. विशेष न्यायाधीश नरोत्तम कौशल यांनी अमर सिंह, सुधीद्र कुलकर्णी यांच्याबरोबर भाजप खासदार अशोक अग्रवाल, फगन सिंह कुलस्ते, माजी भाजप खासदार महाबीर सिंह भागोरा आणि भाजप कार्यकर्ता सोहेल हिंदुस्थानी यांची गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या विविध आरोपातून सुटका केली.

यावेळी न्यायालयाने अमर सिंह यांचा माजी सहकारी संजीव सक्सेना याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याखाली आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात ऑगस्ट 2011 मध्ये दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात अमर सिंह आणि सुधींद्र कुलकर्णी यांना संपूर्ण कटाचे सूत्रधार ठरवले होते. 2008 मध्ये लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी काही खासदारांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न झाला होता.

Leave a Comment