निवडणूक आयोगाची मोदींना समज

नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्तांनी भाजपा नेते नरेंद्र मोदी यांंनी कॉंग्रेसच्या निवडणूक चिन्हाबद्दल अनुदार शब्द वापरू नयेत, अशी त्यांना समज दिली आहे. हाताचा पंजा हे कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह आहे. त्याचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी खूनी पंजा असा केला होता आणि त्यावरून कॉंग्रेसने मोदी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाकडून या संबंधात नोटीस देण्यात आली होती आणि त्यांच्याकडून खुलासा मागवला होता. त्यावर मोदी यांनी उत्तर पाठवले आणि त्यात खूनी पंजा हा लोकभाषेत सर्रास वापरला जाणारा शब्दप्रयोग आहे असे म्हटले. मात्र त्यांचा हा खुलासा आयोगाला पटलेला नाही. आयोगाने त्यांना समज दिली आहे.

नरेंद्र मोदी यांनी हाताच्या पंजाच्या निवडणूक चिन्हावर टिप्पणी करताना खूनी पंजा किंवा जालीम हात असे शब्द वापरू नयेत. त्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जातात, असे आयोगाने मोदी यांना बजावले आहे. मोदी यांनी छत्तीसगडच्या निवडणूक प्रचार सभेत असा उल्लेख केला होता.