लखनौ – संजय लीला भन्साळी यांच्या गोलियोंकी रासलीला रामलीला या चित्रपटाच्या प्रदर्शनावर उत्तर प्रदेशाच्या उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायमूर्ती देविप्रसाद सिंग आणि अशोकपाल सिंग यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेशातील बहराईच येथील मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामलीला समिती यांच्या याचिकेची सुनावणी करताना हा बंदी आदेश जारी केला आहे.
या चित्रपटाला चित्रपट परीक्षण मंडळाचे (सेन्सॉर) प्रमाणपत्र मिळालेले आहे. पण ते देताना जनभावनांचा विचार केला गेलेला नाही. रामलीला या शब्दामध्ये प्रभू रामचंद्राच्या पुण्यकर्माचा समावेश होतो. परंतु या चित्रपटात रामलीला हा शब्द चुकीच्या गोष्टींसाठी वापरला गेलेला आहे, असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
या चित्रपटातले काही संवाद सुद्धा वादग्रस्त आणि आक्षेपार्ह आहेत. हे संवाद या चित्रपटातून काढून टाकण्यात यावेत, कारण ते हिंदूंच्या भावनांना धक्का पोचवणारे आहेत अशीही मागणी या याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेत सेन्सार बोर्ड, राज्य सरकार, केंद्र सरकार, उत्तर प्रदेशाचे मुख्य सचिव आणि चित्रपट निर्माते इत्यादींना प्रतिवादी करण्यात आले आहे.