नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या दोन्ही प्रभावी पक्षांसमोर आव्हान उभे करणार्या आम आदमी पार्टीचा एक उमेदवार एका स्टिंग ऑपरेशनमुळे अडचणीत आला आहे. आम आदमी पार्टीला देणगी दिल्यास आपण देणगीदाराचे जमिनीचे काम करून देण्यास मदत करू, असे आश्वासन या उमेदवाराने दिल्याचे या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून आले आहे.
आम आदमी पार्टीचे हे उमेदवार शाजिया इल्मी यांनी हे स्टिंग ऑपरेशन उघड होताच आपली या निवडणुकीतली उमेदवारी मागे घेतली आहे. हे स्टिंग ऑपरेशन म्हणजे एक बनवाबनवी आहे. परंतु तरी सुद्धा आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी आपण उमेदवारी मागे घेत आहोत असे शाजिया इल्मी यांनी जाहीर केले.
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा हे आपल्या पक्षाविरुद्धचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसल्याप्रमाणे आपल्या उमेदवारांनी काही सौदेबाजी केली असेल तर त्याची गय करणार नाही, असे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. मात्र हे स्टिंग ऑपरेशन कितपत सत्य आहे याची चौकशी करण्यासाठी त्यांनी दोन सदस्यांची समिती नेमली आहे.