कळव्यात इमारत कोसळली

ठाणे – मुंबई आणि ठाण्यात इमारती पडण्याचे सत्र सुरूच आहे. कळव्यात भुसारआळी येथे रविवारी रात्री दीडच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. अन्नपूर्णा अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळत असल्याचे रहिवाशांचा लक्षात आले. त्यामुळे रहिवाशांनी ताबडतोब इमारत रिकामी केली. इमारतीतील तेलंगे कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या इमारतीत 25 कुटुंब राहतात. या इमारतीमधील तेलंगे कुटुंबियांच्या घरात लग्नकार्य असल्याने त्यांच्या घरातील लोक जागे होते. त्यावेळी त्यांच्या घराचा काही भाग कोसळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरीत इमारतीतील अन्य सर्व रहिवाशांना सांगून सर्वजण त्वरीत इमारतीमधून बाहेर आले. रात्री दिडच्या सुमारास ही इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असली तरी तेलंगे कुटुंबियांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.