राहुल गांधी यांची डिमांड कमी

दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मोठीच चुरस निर्माण झाली आहे. शीला दीक्षित यांचा विजय निश्‍चित असल्याचे कॉंग्रेसजनांना वाटत आहे कारण त्यांनी सलग तीन निवडणुका जिंकून दिल्या आहेत. चार राज्यांच्या निवडणुकीत तीन राज्ये भाजपाच्या हातात जात होती. तिथे कॉंग्रेस भुईसपाट होत होती तेव्हा शीला दीक्षित दिल्लीत बाजी मारत होत्या. त्यांच्या विरोधात भाजपा जवळ प्रभावी उमेदवार नसल्याने त्या विजयी होतात. तेव्हा दिल्लीत आपल्याला चिंता करण्याचे कारण नाही असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत होते. पण यावेळी भाजपाने हर्षवर्धन आणि आम आदमी पार्टीने अरविंद केजरीवाल यांना पुढे केल्याने शीला दीक्षित आपला करिष्मा गमावून बसल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची पराभवाकडे वाटचाल सुरू झाली आहे. असे असतानाच राहुल गांधी यांनी प्रचारात उडी घेऊन ही वाटचाल अधिक गतिमान केली आहे. कोणताही कॉंग्रेस विरोधी पक्ष कॉंग्रेसचा पराभव होणार असेच म्हणणार पण दिल्लीत कॉंग्रेसचे नेतेच ही गोष्ट मान्य करायला लागले आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ आणि केन्द्रीय नेते राहुल गांधी यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून पहात असले तरीही दिल्लीतले कॉंग्रेसचे उमेदवार त्यांच्या कडे फ्लॉप शो चा हीरो म्हणून पहायला लागले आहेत. राहुल गांधी आपल्या मतदारसंघात सभेसाठी आले तर आपला पराभव हमखास होणार अशी भीती त्यांना वाटायला लागली आहे.

त्यांना तसे वाटावे अशा काही घटना घडल्या आहेत. दिल्लीत राहुल गांधी यांची एक सभा झाली होती आणि तिला बर्‍यापैकी लोक जमले होते. जमलेल्या लोकांवर काय प्रभाव पडला हे काही माहीत नाही पण काही लोक त्या सभेला आले तरी. काल झालेल्या दुसर्‍या सभेला मात्र लोकच आले नाहीत. मुळात राहुल गांधी या सभेला साडेचार तास उशिरा आले. त्यामुळे लोक वैतागले होते. त्यांची सभा सुरू होताच लोक जायला लागले. सभेचा विचका झाला. राहुल आणि सोनिया गांधी यांच्या सभांच्या बाबतीत एक तंत्र अवलंबले जाते. ज्या गावात त्यांची कधीच सभा झालेली नसते त्या गावात सभा ठेवली जाते. नेहरू गांधी घराण्यातल्या राजपुत्राला किंवा महाराणीला पहायला लोक उत्सुक असतात. शिवाय कॉंग्रेसचे कार्यकर्ते हजर असतातच. त्या व्यतिरिक्त काही लोक पैसे देऊन, वाहनांची व्यवस्था करून आणलेले असतात. अशा लोकांची गर्दी होऊन सभा साजरी होते. या दोघांच्याही बोलण्याचे लोकांना मुळीच आकर्षण नसते. आता तर त्यांना लोक टीव्हीवर बघायला लागले असल्याने त्यांना बघण्याची हौस भागली आहे. या दोघांच्याही सभा अयशस्वी होत आहेत.

दिल्लीत राहुल गांधी यांची सभा फ्लॉप झाल्यापासून त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी सभांची धास्ती घेतली असून त्यांनी पक्षाकडे सभा न ठेवण्याची मागणी करायला सुरूवात केली आहे. आपल्या पक्षाच्या स्टार प्रचारकाची सभा आपल्या मतदारसंघात व्हावी यासाठी उमेदवार धडपडत असतात. पण येथे तर उलटाच प्रकार सुरू आहे. आपल्या स्टार प्रचारकाची सभा घेऊ नये अशी मागणी होत आहे. येत्या एक दोन दिवसांत खुद्द सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग याची एक मोठी सभा दिल्लीत व्हायची आहे. ती कशी होईल अशी धास्ती कॉंगे्रेसच्या नेत्यांच्या मनात आहे. राहुल गांधी यांच्याबाबतीत असा हा काही पहिला प्रकार नाही. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांनी आपल्या मतदारसंघात येऊ नये अशी मागणी केली होती. कारण ते हास्यास्पद विधाने करीत होते. तेव्हा केरळ आणि तामिळनाडूत एकाच वेळी निवडणूक झाली होती. केरळात डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री अच्युतानंदन हे होते. ते ८७ वर्षांचे आहेत. म्हणून राहुल गांधी यांनी त्यांच्या वयाचा मुद्दा काढला आणि त्यावर एका जाहीर सभेत काही टिप्पणी केली. याच वेळी त्यांच्या कॉंग्रेस पक्षाने ज्यांच्याशी हात मिळवणी केली होती ते करुणानिधी तर ८८ वर्षांचे होते. मग राहुल गांधी यांना कोणाच्या वयाचा उहापोह करण्याचा काही अधिकार नव्हता.

त्यांनी अच्युतानंदन यांच्या वयाचा मुद्दा काढताच डाव्या आघाडीने करुणानिधी यांच्या वयाबाबत राहुल गांधी यांना काही बोलता येईना. म्हणून तामिळनाडूतल्या काही कॉंग्रेस उमेदवारांनी त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला येऊ नये अशी मागणी केली. तरीही राहुल गांधी तिथे प्रचाराला गेले. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा २१२ सदस्यांच्या या विधानसभेत कॉंग्रेसला पाच जागा मिळाल्या. शेजारच्या केरळातही याच वेळी निवडणूक होत होती. राहुल गांधी तिकडे ङ्गिरकलेही नाहीत. तिथे मात्र डाव्या आघाडीचा पराभव होऊन कॉंग्रेसच्या हाती सत्ता आली.त्यांचा हा इतिहास सर्वांना आठवत आहे. उत्तर प्रदेशातही त्यांना असाच अनुभव आला. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभांना त्यांच्या पक्षातूनच विरोध होत आहे. कॉंग्रेसचे एकेक पाऊल ङ्गसतच चालले आहे. भारतरत्न किताबाचा त्यांनी निर्णय घेतला. त्यावर आता सचिनला हा किताब का दिला जात आहे असे लोक विचारायला लागले आहेत. दुसरे किताबाचे मानकरी डॉ. यु. एन. आर. राव यांनी तर आपल्याला हा किताब जाहीर झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी सरकारची अक्कल काढली. त्यांचे शब्द कठोर असले तरीही त्यांनी सरकारला मोठीच चपराक लगावली आहे. त्यातच आता पक्षातून आणि आघाडीतून अटलबिहारी वाजपेयी यांनाही भारतरत्न किताब देण्याची मागणी जोर धरायला लागली आहे.

Leave a Comment